Pune Fraud : पुण्यात फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनूज गोयल व अंकित गोयलवर गुन्हा दाखल
स्वाती पाटील यांची श्री कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. श्री कन्स्ट्रक्शन आणि गोयल बंधूंचे मिनामनी गंगा बिल्डर यांच्यामध्ये 18 जानेवारी 2018 रोजी करार झाला होता. या करारानुसार श्री कन्स्ट्रक्शनला दोन इमारतींच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. करारानुसार बिल्डर श्री कन्स्ट्रक्शन कंपनीला 60 टक्के रक्कम बिल्डर चेकद्वारे देईल आणि उरलेली 40 टक्के रक्कमेत 3000 रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे सदनिका देईल, असे ठरले होते.
पुणे : केलेल्या कामाचे पैसे न देता 9 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनुज गोयल (Anuj Goyal) व अंकित गोयल (Ankit Goyal) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकामाचं कंत्राट दिलेल्या महिलेनं पोलिसांत तक्रार दिली. स्वाती पाटील असे तक्रार देणाऱ्या कंत्राटदार महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काम करूनही 9 कोटी रुपयांचं बिल थकवल्याबाबत स्वाती पाटील यांनी गोयल बंधूविरोधात तक्रार दिली होती. मात्र या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण ?
स्वाती पाटील यांची श्री कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. श्री कन्स्ट्रक्शन आणि गोयल बंधूंचे मिनामनी गंगा बिल्डर यांच्यामध्ये 18 जानेवारी 2018 रोजी करार झाला होता. या करारानुसार श्री कन्स्ट्रक्शनला दोन इमारतींच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. करारानुसार बिल्डर श्री कन्स्ट्रक्शन कंपनीला 60 टक्के रक्कम बिल्डर चेकद्वारे देईल आणि उरलेली 40 टक्के रक्कमेत 3000 रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे सदनिका देईल, असे ठरले होते. काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे 15 कोटी 55 लाख 29 हजार 928 रुपयांचे बिल गोयल यांच्या मिनामनी गंगा बिल्डरकडे पाठवले. बिलाच्या एकूण रकमेपैकी 6 कोटी 33 लाख 37 हजार 163 रुपये दिले. उरलेल्या बिलाच्या रकमेतील 1 कोटी 88 लाख 22 हजार 623 रुपये चेकद्वारे आणि 7 कोटी 33 लाख 70 हजार 142 रुपयांच्या तयार सदनिका देणार होते. मात्र गोयल यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने बिलाच्या रकमेचे चेक परत आले. तसेच या प्रोजेक्टमधील आधीच विक्री झालेल्या दोन सदनिका स्वाती पाटील यांना देऊन फसवणूक केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.