तर पब आणि बार बंद करा; देवेंद्र फडणवीस यांचे पुणे पोलिसांना आदेश
यात कोणताही दबाव नाही. मी सीपींना या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितलं आहे. कोणी दबाव टाकत असेल तर कारवाई करायलाही सांगितलं आहे. आरोपीला पिझ्झा, बर्गर दिल्याचे जे आरोप झाले आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितलं आहे. असं केलं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला बरखास्त करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची प्रचंड बोंबाबोंब झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. रेसिडेन्शिअल एरियात असलेल्या पबबाबत आम्ही नवीन धोरण आणणार आहोत. त्याची नियमावली तयार करणार आहोत, असं सांगतानाच पब आणि बारकडून नियमांचा भंग केला जात असेल तर ते बंद करण्याचे आदेश काढा, असे आदेशच पोलीस आयुक्तांना दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आजच्या बैठकीत पोलिसांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. सीसीटीव्ही लावूनच बार किंवा पबने चेक करा. या बार किंवा पबचा सीसीटीव्ही पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करतील. तसेच पुण्यात झालेल्या घटनेसारख्या घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आश्चर्यजनक आणि धक्कादायक
पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता. आमदाराकडून हे झालं होतं, याबाबत विचारलं असता, कोण होता? कोण नाही? यापेक्षा पोलिसांनी काय केलं हे महत्त्वाचं आहे. पोलिसांनी एफआयआर कधी केला याची वेळ आहे. पोलिसांनी भादंविचं कलम 304 लावलं. 304 ए कलम लावलं नाही. 304 ए कलम लावलं असतं तर आरोपींना सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असता. पण पोलिसांनी ते केलं नाही. पोलिसांनी आरोपीचं वय 17 वर्ष असल्याचं सांगितलं. त्याला अॅडल्ट ट्रीट करायला ज्युवेनाईल बोर्डाला सांगितलं. पोलिसांच्या या गोष्टी फर्स्ट अॅक्शन म्हणून झाल्या होत्या. त्यामुळे त्यावर राजकारण करू नये. पण ज्युवेनाईल बोर्डाने जी ऑर्डर काढली आहे, आम्हाला ती आश्चर्यजनक आणि धक्कादायक वाटते, असं फडणवीस म्हणाले.
त्यानंतर ते कलम लावलं
माझ्याकडे एफआयआरची कॉपी आहे. पोलिसांनी रात्री 8.30 वाजता एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी 304 ए कलम लावलं होतं, याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी सारवासारव केली. पोलिसांनी 304 कलमच लावलं होतं, 304 ए कलम लावलं नव्हतं असं सांगणाऱ्या फडणवीसयांनी कोर्टात जाण्यापूर्वी 304 कलम लावल्याचं सांगितलं. सीनिअरने येऊन आधी तपास केला. माहिती घेतली आणि 304 कलम लावायला सांगितलं. 304 ए लावलं तर आरोपींना निगलिजन्सचा फायदा मिळेल असं सीनिअरने सांगितलं. त्यानंतर कोर्टात जाण्यापूर्वी 304 कलम लावण्यता आलं, असं फडणवीस म्हणाले.