पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज घडणाऱ्या हत्या, मारामारीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड हादरुन गेले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारी कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालली आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याचं वारंवार समोर येत आहे. गेल्या 33 दिवसात सात जणांच्या हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
गुन्हेगारी आटोक्यात आणणे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एका टोळक्याने सराईत गुन्हेराची हत्या केल्याची घटना काल घडली आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेतील गुन्हेगारांकडे पिस्तुल आणि कोयते आले कुठून याचा पोलीस शोध घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हे एक औद्योगिक नगरी आहे. चाकण, तळेगाव असा ग्रामीण भाग देखील पिंपरी-चिंचवडमध्ये येतो. औद्योगिक शहर असल्यामुळे लाखोंच्या संख्येत कामगार इथे आपलं पोट भरण्यासाठी येतात.
पण, गुन्हेगारीमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. जमिनीचे वाद, अनैतिक संबंध, लूटमार, दरोडा, बलात्कार, विनयभंग, हत्या अशा अनेक घटना घडत आहेत.