पुणे : पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवका (Ex Corporator)ने अन्न व नागरी पुरवठा विभागातील एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुभाष जगताप (Subhash Jagtap) असे सदर मुजोर माजी नगरसेवकाचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जगताप यांनी महिलेला शिवीगाळ करत, धमकावले. तसेच महिलेच्या हाताला आणि ओढणीला स्पर्श करत मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले. याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे या कलमातंर्गत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप हे त्यांच्या परिसरातील नागरिकांचे रेशनकार्ड संबंधातील कागदपत्र घेऊन आले होते. सदर कागदपत्रे पीडित महिला अधिकाऱ्याने पाहिले ते विहित शासकीय नमुन्यात नव्हते. तसे त्या त्यांच्या सहकाऱ्यांना सांगत असताना जगताप यांनी हे बोलणे ऐकले आणि महिला अधिकाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत करत ते संबंधित महिलेच्या जवळ जाऊ लागले. महिलेने त्यांना दूर होण्यास सांगितले असता ते त्यांनी आणखी जवळ येत महिलेच्या हाताला आणि ओढणीला स्पर्श केला. यावेळी कार्यलयातील परिमंडळीय अधिकारी तेथे आले आणि त्यांनी जगताप यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु जगताप यांनी त्यांचा हात झटकत पुन्हा महिलेच्या जवळ जाऊन तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मी तुमच्या कार्यालयात काहीही करु शकतो. तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही. तुमच्याकडे पण पाहून घेतो, अशी धमकीही दिली.