Pune Crime : ऑनलाईन मोबाईल मागवला, मग खोक्यात साबण कसा आला, कोण करतं हा कारनामा, असं आलं समोर
ते मोबाईल ऑर्डर करायचे. पार्सल हातात येताच आत मोबाईलऐवजी साबण, फरशीचे तुकडे असायचे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
पुणे / 30 ऑगस्ट 2023 : पुण्यात फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या फ्लिपकार्टच्या चार कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून 4.5 लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे 19 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. फ्लिपकार्टचे कर्मचारीच फसवणूक करत होते. ऑर्डर केलेल्या मोबाईलच्या बॉक्समध्ये बंद मोबाईल, फरशीचे तुकडे आणि साबण ठेवून मोबाईल विक्रेत्यांची दोघांची फसवणूक करायचे. अखेर या कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका दुकानमालकाच्या तक्रारीनंतर घटना उघड
एका मोबाईल दुकान मालकाने 7.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दुकानदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. अनेक ग्राहक बड्या कुरिअर कंपन्यांमार्फत मोबाईल खरेदी करतात. तसेच त्या कुरिअर कंपन्या मोबाईल दुकानात ऑर्डर नोंदवून ग्राहकांना मोबाईल घरपोच देतात, हे माहिती असल्यामुळे पोलिसांनी एक कुरिअर कंपनी गाठली.
चौघांना अटक, 19 मोबाईल जप्त
कुरिअर कंपनीचे चार कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानात परत देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते. पोलिसांनी अधिक तपास करून या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 4.5 लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे 19 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.