Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार प्रवाशांचा मृत्यू
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून अपघात झाला.
पुणे : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत चौफुला येथे आज पहाटे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमींना नजिकच्या केडगाव येथील दवाखान्यात तर काही गंभीर जखमींना पुण्याला हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.
या अपघातात हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक नितीन दिलीप शिंदे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
टायर फुटल्याने बस कंटेनरवर आदळली
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून अपघात झाला. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.
खेड शिवापूरजवळ 24 तासात सलग दुसरा अपघात
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ 24 तासात सलग दुसरा अपघात झाला आहे. काचांनी भरलेला कंटेनर पलटल्यानं हा अपघात झाला. कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी झाला.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघानंतर रस्त्यावर काचांचा खच साचल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.