पुणे : सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. टोळ्यांकडून विविध प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आधीच कोयता गँगच्या दहशतीखाली असलेले पुणेकर आता वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीमुळे बेजार झाले आहेत. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना पुण्यात घडली आहे. गोखले नगर भागात टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आहे.
रविवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. हातात शस्त्रे पाहून नागरिकही भीतीने घराबाहेर पडले नाही. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन तोडफोड केली.
या घटनेत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या तर दुचाकी गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फोडल्या. पुण्यात रात्री मध्यरात्री काही तरूण टोळकी तोंडाला मास्क लावून हातात दगड, दांडकी घेऊन गाड्यांची तोडफोड करत आहेत.
याआधी लोणावळ्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या दिवशी पार्किंगच्या वादातून पर्यटकांना गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. रोहन गायकवाड आणि इम्मू शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुकानासमोर गाडी लावण्यावरुन झालेल्या वादाचे मारामारीत रुपांतर झाले. आरोपींनी पर्यटक निरजकुमार आणि त्याचे मित्र हर्ष यांना गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केली. यानंतर आरोपी फरार झाले.