पुणे : पुणे शहर शैक्षणिक हब झाले आहे. त्याचबरोबर उद्योगांची नगरी झाली आहे. यामुळेच पुणे शहरात देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण आणि रोजगारासाठी येतात. त्यामुळे पुणे शहरात पेईंग गेस्ट, हॉस्टेल हा एक लहान उद्योग झाला आहे. पुणे शहरात नवीन असलेले लोक हॉस्टेलचा शोध ऑनलाईन पद्धतीने घेतात. मग या प्रकाराचा फायदा भामटे घेत आहेत. हॉस्टेल शोधणाऱ्यांची फसवणूक झाल्याच्या आठ तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांनी पुणे शहरात हॉस्टेलचा शोध सुरु केला असेल तर सावध व्हावे, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. यामुळे पुणे शहरातील महाविद्यालायत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही. मग असे विद्यार्थी ऑनलाईन हॉस्टेल शोधतात. त्यात त्यांची फसवणूक होत आहे. यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यात म्हटले आहे की, ऑनलाइन पद्धतीने एका व्यक्तीचा हॉस्टेलसंदर्भात क्रमांक मिळाला. त्याच्याशी संपर्क केल्यावर त्याने हॉस्टेलचे फोटो पाठवले. आवडले असेल आताच दहा हजार डिपॉझिट अन् चार हजार रुपये महिन्याचे भाडे द्या, अन्यता दुसऱ्या व्यक्ताला देतो, असे सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीला युपीआयने १४ हजार रुपये पाठवले.
पैसे पाठवल्यावर दिलेल्या पत्यावर गेले असता ते हॉस्टेल नव्हते. दुसऱ्या कोणाचा तरी रहिवास त्या ठिकाणी होता. मग परत त्या व्यक्तीला फोन केल्यावर तो शिवीगाळ करु लागला, असे दिल्लीतून आलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडे अशा आठ तक्रारी गेल्या काही दिवसांत आल्या आहेत.
जळगावच्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला जो हॉस्टेलचा पत्ता दिला त्या ठिकाणी गेलो असतो, ते पुणे सायबर पोलीस ठाण्याचे आवार होते. त्यांनी १६ हजार रुपये त्या व्यक्तीला पाठवले होते.