बारामती : जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजवाडी परिसरातील अवैध दारू भट्टयांवर पोलिसांनी कारवाई केलीय. परिसरातील दारू भट्टयांचा शोध घेऊन थेट पोकलेनद्वारे त्या नष्ट करण्यात आल्यात. या कारवाईत तब्बल 1 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. याशिवाय भट्टीसाठी वापरली जाणारी लाकडेही जाळून टाकण्यात आलीत (Jejuri police action against illegal liquor alcohol production unit Pune).
जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू भट्टया असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत ग्रामस्थांच्याही वारंवार तक्रारी आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारु भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेतकऱ्यांच्या शेतात अवैधपणे टाकलेल्या दारु भट्ट्या थेट पोकलेनच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या.
जेजुरी पोलिसांनी अवैध दारु भट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात अशा भट्ट्या आढळून येत आहेत. याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी अन्यथा संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यासह शेतकरी आणि जमीन मालकावरही कारवाई केली जाईल, असा इशारा जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिलाय.
या कारवाईमध्ये जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार संदिप कारंडे, पोलीस शिपाई प्रविण शेंडे, अमोल महाडीक यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जेजुरी पोलिसांनी केलेल्या या अनोख्या कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होवू लागली आहे.