कुख्यात गुंड गजा मारणेचा जामीन फेटाळला, जेलमधून सुटल्यानंतर धांगडधिंगा प्रकरणी दिलासा नाहीच
हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेला कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला धांगडधिंगाही अंगलट आला होता. तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर तीनशे गाड्यांसह काढलेली मिरवणूक त्याला पुन्हा तुरुंगाच्या वाटेवर घेऊन गेली.
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी गजा मारणेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मारणेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला होता.
काय आहे प्रकरण?
हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेला कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला धांगडधिंगाही अंगलट आला होता. तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर तीनशे गाड्यांसह काढलेली मिरवणूक त्याला पुन्हा तुरुंगाच्या वाटेवर घेऊन गेली. साताऱ्यातील जावळी तालुक्यात गजा मारणेला फिल्मी स्टाईल बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेने पुण्याच्या अंडरवर्ल्ड क्षेत्रात आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे.
कोण आहे गजा मारणे? (Who is Gajanan Marne)
गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
2014 पासून तुरुंगात, सात वर्षांनी सुटका
गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली.
गजा मारणेची तीनशे गाड्यांसह मिरवणूक
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.
गजा मारणे लँड क्रुझरमध्ये
गजा बसलेल्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये होती. मिरवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती.
मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला. तसेच गजा मारणेवर मोक्का कायद्याअंतर्गत कारावाई केली जाईल, असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणी गजासह 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गजा मारणेचा गुंगारा
कित्येक दिवसांपासून गजा मारणे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. त्याने पुण्यातून पलायन करुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी 6 मार्च रोजी अटक केली.
गजा मारणेला पोलिसांच्या बेड्या, पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
गजा मारणेच्या अडचणीत वाढ, पिंपरी चिंचवड पोलीस मोक्का लावणार
गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश
VIDEO | गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी कसं पकडलं?, पाहा थरारक CCTV फुटेज