दोन दिवस आधी पाळत, 5 वर्षापासून संपर्कात, पुण्यात 14 वर्षाच्या मुलीची हत्या नेमकी कशी झाली? पोलीस आयुक्तांची डिटेल माहिती
दोन दिवस आधी आरोपीने स्पॉटवर मुलीवर पाळत ठेवली होती. पाच वर्षांपासून आरोपी मुलीच्या संपर्कात होता. आरोपी हा मयत मुलीचा नातेवाईक होता, अशी माहिती अमिताभ गुप्तांनी दिली.
पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीच्या हत्येनंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपी दोन दिवस आधीपासून घटनास्थळी मुलीवर पाळत ठेवून होता, तर 5 वर्षांपासून पीडितेच्या संपर्कात होता. आतापर्यंत मुख्य आरोपीसह चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं अमिताभ गुप्तांनी सांगितलं.
अमिताभ गुप्तांनी काय सांगितलं?
पीडित अल्पवयीन मुलगी कबड्डीच्या सरावासाठी काल (मंगळवारी) यश लॉन्स परिसरात आली होती. त्याचवेळी आरोपीने तिच्यावर हल्ला केला. दोन दिवस आधी आरोपीने स्पॉटवर मुलीवर पाळत ठेवली होती. पाच वर्षांपासून आरोपी मुलीच्या संपर्कात होता. आरोपी हा मयत मुलीचा नातेवाईक होता, अशी माहिती अमिताभ गुप्तांनी दिली.
काल 4 ते 5 मुली मैदानात कबड्डीचा सराव करत होत्या. त्या मुलींपैकी एका मुलीचा नातेवाईक तिथे आला, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने हल्ला केला. त्या हल्यात ती मुलगी मृत्युमुखी पडली. मुख्य आरोपीसह इतर दोन जणांना अटक केली आहे. आम्ही हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी प्रयत्न करु, पुण्यातील सुरक्षेसाठी आम्ही वेगवेगळे उपाययोजना करत आहोत, अशी हमी पोलीस आयुक्तांनी दिली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली.
शीर धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न
आरोपी हा अत्यंत त्वेषाने अल्पवयीन मुलीकडे गेला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. त्यावेळी आरोपींनी मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या आरोपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
पिस्तूल टाकून पोबारा
ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :
भयंकर ! पुण्यात आठवीच्या मुलीची हत्या, तो वार करत होता तेव्हा लहान मुलं खेळत होती, मोठे घाबरुन पळाले
पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप