पुणे : पुण्यात बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हडपसर येथील रेल्वे रुळावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायबर कॅफेमध्ये कामानिमित्त जात असल्याचं सांगून ती दुपारी घराबाहेर पडली होती. मात्र रात्रीच्या सुमारास ती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत सापडली. परंतु तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुणे मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीतून ती बेपत्ता झाली होती. प्रतिमा भास्कर कुटगे (वय 22 वर्ष, रा. आंबेडकर नगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रतिमाने आत्महत्या केली, तिचा अपघात झाला, की तिच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे प्रकरण?
प्रतिमा सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती.
संध्याकाळनंतरही तिच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे प्रतिमाच्या नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा धाव घेतली.
नेमकं काय घडलं?
प्रतिमा बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली. त्यानुसार मार्केट यार्ड पोलीस तिचा शोध घेत होते. त्यावेळी संबंधित वर्णनाची एक तरुणी हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळल्याचं पोलिसांना समजलं. नातेवाईकांनी मृतदेह पाहिला असता प्रतिमाचाच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र प्रतिमाने आत्महत्या केली, तिचा अपघात झाला, की तिच्यासोबत घातपात झाला, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
नंदुरबारमध्ये युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलले
दुसरीकडे, नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
सीसीटीव्हीमध्ये प्रेमी युगुल कैद
कुठलाही पुरावा नसल्याने अनोळखी मृतदेहाचा तपास लावण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण आणि एक तरुणी सुरतच्या दिशेने येऊन नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसली होती.
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.
लग्नाचा तगादा लावल्याने हत्या
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आमचं फोनवरून प्रेम झालं होतं, मात्र ती वारंवार लग्नासाठी मागे लागत असल्यामुळे त्याच रागातून हत्या झाल्याचा दावा आरोपीने केला. मुलगी बिहारच्या छपरा येथील, तर आरोपी तरुण सिवनचा रहिवासी आहे.
संबंधित बातम्या :
मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं
मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ
लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत