डेटिंग अ‍ॅपवरील ओळख महागात, लग्नाच्या आमिषाने पुण्यातील महिलेची 73 लाखांना फसवणूक

| Updated on: Oct 15, 2021 | 8:54 AM

आरोपी सिद्धार्थ रवी याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच महिलेशी लग्न करण्याचे आणि भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवले होते

डेटिंग अ‍ॅपवरील ओळख महागात, लग्नाच्या आमिषाने पुण्यातील महिलेची 73 लाखांना फसवणूक
पुण्यात वाकड पोलीस स्टेशन
Follow us on

पिंपरी चिंचवड : आयटी अभियंता असलेल्या महिलेला ‘टिंडर’ या डेटिंग अॅपवर झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे अमिष दाखवून महिलेची 73 लाख 59 हजार 530 रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पीडित 35 वर्षीय आयटी अभियंता महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

सिद्धार्थ रवी या व्यक्तीसह 18 बँक खाते धारकांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सिद्धार्थ रवी याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच महिलेशी लग्न करण्याचे आणि भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवले होते

नेमकं काय घडलं?

सिद्धार्थ रवीने फिर्यादी महिलेला महागडे गिफ्ट पाठवून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले.

तीच मोडस ऑपरेंडी

इतकी मोठी रक्कम सोडवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी विविध कारणे सांगितली. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर फिर्यादीला 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली आहे.

मॅट्रिमोनियल साईटवरुन फसवणूक

दुसरीकडे, प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनियल साईटवर 100 महिलांना गंडा, 25 कोटींची लूट, परदेशी नागरिकासह तिघे अटकेत

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त