पुणे : डॉक्टर महिलेच्या रूममध्ये छुपे कॅमेऱ्या लावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बड्या डॉक्टरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुजित जगताप असं या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये त्याने स्पाय कॅमेऱ्या लावल्याचा आरोप आहे. 42 वर्षीय सुजित जगताप हा MD आहे.
त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टरला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. डॉक्टर सुजितने छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं तपासात समोर आलं आहे.
भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळले होत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर MD सुजित जगतापने हे कॅमेरे लावल्याचा आरोप आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडित महिलेने 6 जुलै 2021 रोजी तक्रार नोंदवली होती.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.
आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.
संबंधित बातम्या :
पुण्यात महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुममध्ये छुपे कॅमेरे, बड्या एमडी डॉक्टरला अटक
डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल