पुण्यात MBBS प्रवेशासाठी 16 लाखाची लाच घेताना डीनला अटक
पुण्यात MBBS च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे तब्बल 16 लाखांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे एसीबीने याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला रंगेहात अटक केली आहे.
पुणे | 8 ऑगस्ट 2023 : अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं. डॉक्टर बनण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. कारण वैद्यकीय शिक्षणही तितकंच कठीण असतं. याशिवाय वैद्यकीय शिक्षणासाठी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी आपलं नशिब आजमावत असतात. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये चांगलं यश येतं. त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा खर्च शासनाकडून केला जातो. तर काही विद्यार्थ्यांचे पालक स्वखर्चातून आपल्या पाल्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतात. पण काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने त्यांचं मेरीट लिस्टमध्ये नाव येत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. पण त्यांच्यात जिद्द असली तर त्यांना प्रयत्न केल्यावर वैद्यकीय शिक्षणासाठी हव्या त्या महाविद्यालयात नक्कीच यश मिळतं.
वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रचंड प्रयत्न आणि खटाटोप केला जात असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात 16 लाख रुपयांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक करण्यात आली आहे. एसबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगीनवार यांना अटक करण्यात आली आहे. डीन आशिष बनगीनवार यांनी पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून लाच मागितल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांच्या MBBS प्रवेशासाठी डीनकडून 16 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचं उघड झालंय.
एसीबीने कारवाई कशी केली?
डीनने ज्या विद्यार्थ्याकडे 16 लाखांची मागणी केली होती त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी एसीबीकडे धाव घेतली होती. एसबी अधिकाऱ्यांनी सर्व घटनाक्रम ऐकून घेतला होता. त्यानंतर एसीबीने आरोपी डीनला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. डीनला वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 16 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. पण हे पैसे दोन टप्प्यात द्यायचं तडजोडीअंती ठरलं होतं.
पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपयांचा हप्ता डीनला देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार संबंधित विद्यार्थी आणि त्याचे पालक पैसे घेऊन डीनकडे गेले. यावेळी एसीबीने डीनला लाच घेताना रंगेहात पकडलं. एसीबीने डीनला या प्रकरणी अटक केली आहे. तसेच या सगळ्या प्रकरणी आता पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.