योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी अपडेट समोर, पोलिसांच्या हाती मोठं यश
पुण्यातील निर्जनस्थळी सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात धक्का बसला. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे.
पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भरदिवसा अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ असे योगेश टिळेकर यांच्या मामांचं नाव असून त्यांच्या हत्येमुळे सर्वांना धक्का बसला आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलं आहे. सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच योगेश टिळकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ ( वय 55) हे नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर चार आरोपींनी त्यांना जबरदस्ती एका गाडीत बसवलं. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. काल संध्याकाळी पुण्यातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात धक्का बसला.
या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांचा खून अपहरण झालेल्या गाडीतच करण्यात आला. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून सुपारी देऊन करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश टिळेकर यांना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील पळून गेलेल्या हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरु आहे.
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं समोर आली आहेत. पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी ) अशी या संशयितांची नावे आहेत. सतीश वाघ यांचा धावत्या मोटारीत खून करण्यात आला. तसेच आरोपींनी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील मोकळ्या जागेत टाकून दिला. त्यानंतर आरोपी अर्धा-पाऊण तासात पुन्हा त्याच गाडीतून पुण्याकडे परतले.
कोण होते सतीश वाघ?
सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी आहेत. त्यांचा पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात व्यवसाय देखील आहे. त्यांच्याकडे काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सतीश वाघ यांचे कोणाशीही भांडण नव्हते. मग त्यांचे अचानक अपहरण का करण्यात आलं, त्यानंतर त्यांचा खून का करण्यात आला, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.