वनराज आंदेकरांच्या हत्येचा कट किती दिवसांपासून रचण्यात आला? का झाली हत्या? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
Vanraj Andekar Death Case Investigation : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांचा खून आंदेकर टोळीचा बॅक बोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या एक महिन्यांपासून वनराज आंदेकरांचा खुनाचा कट रचण्यात येत होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड यांची याच भागात टोळी आहे. तर दुसरीकडे आंदेकर यांचीही पुण्यातील याच भागात टोळी होती. आंदेकर टोळीची पुण्यात मोठी दहशत आहे. याच टोळी युद्धातून आंदेकरांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्येचा प्लॅन सोमनाथ गायकवाड यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज आंदेकरचा खून झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होते का काय अशी भीती निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
वनराज आंदेकर कार्यजवळ एकटेच उभे होते, त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली. अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. गोळीबार झाल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. बंडू आंदेकर याच्याविरूद्ध 1985 पासून हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर याचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर अन् कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे.