पिंपरी चिंचवड: बरोबर तीन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) थेरगाव क्वीनला (Thargaon Queen) अटक केली होती. इन्स्टाग्रामवरुन अश्लील भाषा वापरणं, शिवीगाळ करणं आणि धमक्या देणं या कारणावरुन 18 वर्षीय मुलींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या थेरगाव क्वीनचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल (Instagram viral reels) झाले होते. पिंपरी चिंतवड भागा लेडी डॉन म्हणून वावरत असल्याऱ्या या तरुणीनंतर आता आणखी एका तरुणाला अटक केली. इन्स्टा अकाऊंटवरुन विरोधी गटाला धमकावणारे आणि आव्हान देणारे व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. या तरुणानं कोयता वापरुन भाईगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या शस्त्र विरोधी पथकानं तातडीनं पुढे येत कारवाई केली. वारंवार विरोधी गटाला धमकावण्यासाठी हा तरुणी इन्स्टाचा वापर करत असल्याचही निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं होतं. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.
थेरगाव क्वीननंतर भाईगिरी करणारा तो तरुण कोण? असा प्रश्न आता उपस्थित होणं स्वाभाविक आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव तेजस नितीन वायदंडे आहे. त्याला शस्त्रविरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. तेजसने इन्स्टावरुन व्हिडीओ अपलोड करत तडीपार असलेल्या गुंडाना आव्हान दिलं होतं.
रणजीत चव्हाण हा तडीपार गुंड असून त्याच्यासह अजय नावाच्या आणखी एका गुन्हेगाराला ओपन चॅलेंज तेजनं दिलं होतं. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. गुन्हेगारांकडून विरोधी गटातील व्यक्तींना उकसवण्यासाठी इंन्स्टाचा वापर सर्रास केला जात असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
दरम्यान, शस्त्र विरोधी पथकानं केलेल्या कारवाईमुळे आता रिल्स करणाऱ्यांनी खबरदारी बाळगणं आणि सतर्क राहण्याचीही गरज आहे. पोलिसांकडूनही तसं आवाहन करण्यात येतंय. उकसवणारी भाषा, अश्लील किंवा आक्षेपार्ह कंटेट इन्स्टाच नव्हे तर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकल्यास कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तेजस नितीन वायदंडे यांच्या एका हातात कोयता घेऊन केलेला रील त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. एका हातात कोयता घेऊन छातीत कोयत्यानं वार करण्याची भाषा तेजसनं या व्हिडीओमध्ये वापरली होती. आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जातेय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरुन भाईगिरी करणाऱ्यांचं धाबं या अटकेच्या कारवाईमुळे चांगलंच दणाणलं आहे.
तीन महिन्यांपूर्वी देखील करण्यात आलेल्या थेरगाव क्वीनच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकरांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होतीत. मात्र आता पुन्हा पिंपरी चिंचवडमध्येच शस्त्र विरोधी पथकानं केलेल्या कारवाईमुळे इन्स्टावर भाईगिरी करणाऱ्यांना आवरण्याचं आव्हानं पोलिसांसमोरही उभं ठाकलंय. त्याचप्रमाणे मुलांच्या पालकांनाही याबाबत सतर्कता बाळण्याचं आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.