पिंपरी चिंचवड : मोहननगर भागात विशाल गायकवाड या 29 वर्षीय सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. आधी गोळीबार करत तसेच धारदार शस्त्राने वार करत विशाल गायकवाड याची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. या हत्याकांड प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. विशाल एका चौकात उभा असताना मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आधी गोळीबार करुन नंतर त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.
जुन्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. 23 वर्षीय गुन्हेगार पवन लष्करे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरच विशालही हत्या झाली आहे का, याचाही तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे. 25 ऑक्टोबर रोजी मोशी येथील पवन याचीही हत्या करण्यात आली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास विशाल हा एका चौकात उभा होता. त्यावेळी आठ जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. त्या आठ जणांमधीलच एकाने विशालवर आधी गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यात आलं होतं.
गंभीर जखमी विशालला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्याच्या मृत्यू झाला. विशालवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती देखील समोर आली आहे. ही हत्या कुणी केली, याचा तपास आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जातोय.
कुख्यात विशाल गायकवाड हा तरुण सराईत गुन्हेगार होता. अवघ्या 29 वर्षांच्या विशाल गायकवाडवर अनेक गुन्हेही दाखल होते. खून, मारमारी, लूटमार, दरोडा यांसारखे तब्बल 12 गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर होते. इतकंच काय तर 2017 साली मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. तो पिंपरीमध्ये एक वॉशिंग सेंटर चालवत होता. दरम्यान, आता त्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.