सुनील थिगळे, टीव्ही 9 मराठी, पुणे : वयाच्या 86 व्या वर्षी वडिलांनी लग्न करण्याच्या हेतूने वधू वर सूचक मंडळात नाव नोंदणी केली. याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगरमध्ये झालेल्या भीषण हत्याकांडामागील कारण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रॉपर्टीत वाटेकरुच्या भीतीने पोराने बापाला संपवल्याचा आरोप आहे.
वडिलांनी दुसरे लग्न केले, तर समाजात वावरताना अपमान होईल. शिवाय मालमत्तेत हिस्सेदार होईल, या रागाने मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर घरातील सुरीने वार केले. सुरी बोथट असल्याने गळा चिरला जात नव्हता. म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवलं, अशी माहिती खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.
गुरुवारी खुनानंतर मुलाने खेड पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची माहिती दिली. तोच फिर्यादी झाला आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय 86 वर्ष) असं मयत वडिलांचं नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे (वय 47 वर्ष, रा. राजगुरुनगर) असं आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक म्हणजे अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून करुन मुलाने वडिलांवरही जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील काझड येथे उघडकीस आला होता. आई-वडील मागितले तितके पैसे देत नाहीत, या कारणावरुन त्याने हा हल्ला केल्याचा आरोप झाला होता.
पुण्यातील धनकवडी भागात 42 वर्षीय व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत डोकं घालून आईचा जीव घेतला. गुदमरल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले होते. यानंतर त्यानेही आत्महत्या केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यात घडलेल्या या तीन घटनांमुळे खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा ताब्यात, जन्मदात्यांच्या खूनाची नववर्षातील तिसरी घटना
जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला
आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं