अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : एमआयटी महाविद्यालयात (MIT Collage Student Car accident) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू (Pune Accident News) झालाय. तर 5 जण जखमी झालेत. सासवड पोलीस (Saswad Police) स्थानकाच्या हद्दीत झालेल्या या अपघाताची नोंद करण्यात आलीय.
गौरव ललवाणी, वय 19 आणि रचित मोहता, वय 18 अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलींचाही समावेश आहे.
एका तीव्र वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर रस्त्याच्या शेजारीत असलेल्या दुकानांना ही कार धडकली आणि उलटली. भरधाव वेगामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारची जागच्या जागीच उलटली होती.
घरापासून लांब शिकायला म्हणून आली, पालकांनी कारही दिली, का तर मुलांना सोयीचं जावं.. मुलं चांगल्या उद्देशाने देवदर्शनाला निघाली पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं. VC : अभिजीत पोटे, पुणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी #Pune #Videos #Accident pic.twitter.com/bCA1nt0o1R
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 4, 2022
एमआयटी कॉलेजात शिकणारे हे सर्व विद्यार्थी असून ते देवदर्शनासाठी निघाले होते. नारायणपूरला देवदर्शनासाठी जाण्याचं बेत त्यांनी आखला होता. ठरल्याप्रमाणे ते देवदर्शनासाठी निघालेली. पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर इतर विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावलेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर असलेल्या एका दत्त मंदिराशेजारी या विद्यार्थ्यांची महिंद्रा एक्सयूव्ही 300 कार अपघातग्रस्त झाली. ही कार उलटण्याआधी तिने मेघमल्हार टी हाऊस आणि शिवलक्ष्मी दुकानालाही धडक दिली. अखेर ही कार पलटी झाली.
स्थानिकांनी तातडीने पलटी झालेल्या कारच्या दिशेने धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण त्यातील दोघांना डॉक्टरांनी आधीच मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. अपघातातील सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती समोर आलीय. हे सर्व जण शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते.
दरम्यान, पुण्यातील अपघाताची ही घटना ताजी असतानाच तिकडे लातुराही भीषण अपघात झाला. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. एसटी बस आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार झाले, तर एक तरुणी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलीय. गेल्या 24 तासांच्या झालेल्या या दोन भीषण अपघातात 7 जणांनी जीव गमावलाय.