पुणे : पुणे गेल्या 24 तासांच्या आत चार दुचाकीस्वारांनी (Pune Biker died) जीव गमावला आहे. पुणे शनिवारी झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण चार दुचाकीस्वारांचा बळी गेला. यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. पहिल्या घटनेत झाड पडून दोघा बाईकस्वारांचा जागीच जीव गेला होता. तर दुसरी घटना घडली पुणे महापालिकेच्या (PMC 2022) टर्फ क्लब चौकाच्या हद्दीत. पुणे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली. भरधाव कचऱ्याची गाडी (PMC Garbage Vehicle) दुचाकीला धडकली आणि यात दुचाकीवरील दोघेही जण दूरवर फेकले गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. हे दोघेही दुचाकीस्वार हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील असल्याची माहितीही समोर आली आहे. तर भरधाव वेगाने आणि अत्यंत बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन घेत त्याला अटकही करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने वानवडीतील टर्फ क्लब चौकात दुचाकीला धडक दिली. भरधाव ट्रकची धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील दोघेही जण डिव्हायरच्या दिशेने फेकले गेले. यात दोघांनाही गंभीर जखम झाली. दुचाकीवर एक जण जवान असून त्याचं नाव हनुमंत दगडू काळे आहे. ते 43 वर्षांचे होते. तर त्यांच्यासोबत दत्त पोपट काळे हे देखील निघाले होते. त्यांचं वय 40 असून ते दोघेही जण श्रींगोद्यातील आढळगाव इथले रहिवासी होती. ते कामानिमित्त पुण्यात आले असता त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि यात त्या दोघांचाही जीव गेला.
हनुमंत काळे हे उत्तराखंडमध्ये सैन्य दलात कर्तव्यावर असून ते सुट्टीनिमित्त घरी परतले होते. मूळगावी आले असता काही कामानिमित्त ते दुचाकीवरुन पुण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या अपघातात हनुमंत काळे यांच्यासह दत्त पोपट काळे यांचाही मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. ही घटना ताजी असतानाच आणि एक अपघात हा भोसरी पोलीस ठाण्याच्या समोर घडला. दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांवर झाड कोसळलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही युवकांनी हेल्मेटही घातलं होतं. मात्र भल्यामोठ्या वृक्षाचं खोड थेट डोक्यावर आदळल्यानं दोघाही तरुण दुचाकीस्वारांचा जीव गेला होता. दरम्यान, 24 तासांच्या आत चार दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.