Pune Dog Story: आवड की विक्षिप्तपणा? 22 भटक्या कुत्र्यांसोबत दोन वर्षे राहिलेल्या मुलाचं काय होणार?
मुलाच्या मनावर परिणाम होऊन हाही कुत्र्यासारखा वागतोय अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलीये. गेल्या दोन वर्षांपासून या मुलाला आई वडिलांनी बाहेरचं काढलं नाही. मात्र या मुलाची माहिती सामाजिक संस्थेला मिळाल्यानंतर कार्यकर्तीनं पोलीस ठाण्यात तक्रार देऊन या मुलाची सुटका केली आहे.
पुणे : प्रत्येक व्यक्तीला येता जाता रस्त्यावर भटकी कुत्री (Dogs) पाहायला मिळतात. रस्त्यावर एखादं कुत्र्याचं पिल्लू पाहायला मिळालं आणि ते चांगल असेल तर आपण घरी घेऊनही जातो. मात्र पुण्यातल्या (Pune Crime) एका घरात एकूण 22 कुत्री पाहायला मिळाली आहेत. यात सगळी कुत्री रस्त्यावरून आणली आहेत. गेल्या दोन वर्षापासून एका खोलीत त्यांना ठेवलं जातंय. पण फक्त कुत्र्यांना ठेवलं जात नाही तर चक्क एका लहानग्याला (Boy with dogs) त्यांच्याबरोबर तब्बल दोन वर्षे कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडाला आहे. पुण्यातील गोकुळनगरमधील कृष्णाई सोसायटीतला हा सगळा प्रकार आहे. 11 वर्षांचा पोटचा मुलगा या आई वडिलांनी गेल्या दोन वर्षापासून घरात डांबून ठेवलाय. आता त्याचा परिणाम झाला असा की या मुलाच्या मनावर परिणाम होऊन हाही कुत्र्यासारखा वागतोय अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलीये. गेल्या दोन वर्षांपासून या मुलाला आई वडिलांनी बाहेरचं काढलं नाही. मात्र या मुलाची माहिती सामाजिक संस्थेला मिळाल्यानंतर कार्यकर्तीनं पोलीस ठाण्यात तक्रार देऊन या मुलाची सुटका केली आहे.
आई – वडिलांवर गुन्हे दाखल
मुलाला नेमकं घरात का कोंडून ठेवलं असावं? हा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारला असता ते म्हणाले, त्याचे आई वडील विक्षीप्तपणानं वागत आहेत आणि मुलालाही वागवून घेत आहेत. त्यामुळे घरात रस्त्यावरची कुत्री उचलून आणून 22 कुत्री ठेवल्याचं सांगितलं. घरात कोणतीही स्वच्छता नाही, कुत्र्यांचा सांभाळ नाही आणि पोटच्या मुलाचाही नाही. गेल्या दोन वर्षापासून यांच्यातचं राहून याचीही मनस्थिती बिघडलीये आणि त्याच्याही मनावर परिणाम झालाय. आता पोलिसांनी आई वडिलांवर गुन्हा दाखल करत मुलाला बालसुधारगृहात पाठवलंय.
आई-वडिलांना काय शिक्षा होणार?
मुलाचं वय अवघं 11 वर्ष आहे या मुलाला जर दोन वर्षात घराच्या बाहेरचं येऊ दिलं नसेल तर याची काय अवस्था झाली असेल, आई-वडिलांच्या या विक्षीप्तपणाचा त्रास या मुलाला सहन करावा लागतोय. दोन वर्षांपासून डांबून ठेवल्यानं आज मुलावर प्राण्यासारखी वागायची वेळ आली . त्यामुळे आई-वडिलांना आवड आणि विक्षीप्तपणा यातला फरक ओळखला असता तर या मुलावर ही वेळ आली नसती, मात्र आता बालसुधारगृहात पाठवून मुलाला बरं करण्याची वेळ आलीये. त्यामुळे घरात पाळलेल्या कुत्र्याची आणि मुलाची अवस्था एकच असं चित्र या घटनेनं दाखवून दिलंय. मात्र आता या आई-वडिलांना कोर्ट काय शिक्षा देतं हे पाहणं महत्वाच असेल.