पुणे : पुणे जिल्ह्यात कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्याच्या दोन घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. खेड-राजगुरु नगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर डोक्यात दगड टाकून राहुलला संपवण्यात आलं, तर दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली.
राहुल उर्फ पप्पू वाडेकर
पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरमध्ये पाबळ रोडवर तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. राहुल उर्फ पप्पू वाडेकर असं हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाला असल्याचा खेड पोलिसांचा अंदाज आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडिपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात प्रवेश केला, त्यावेळी त्याची हत्या झाली.
राहुल उर्फ पप्पू वाडेकर
अक्षय किरतकिर्वे
दुसरीकडे, पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाचीही हत्या करण्यात आली. चौघा जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी अक्षयवर कोयत्याने सपासप वार केले होते. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला.
गुंड अक्षय किरतकिर्वे याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याचीही पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकामागून एक झालेल्या दोन गुंडांच्या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.
23 सराईत गुन्हेगार तडीपार
दुसरीकडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या भोसरी, पिंपरी, निगडी, भोसरी एमआयडीसी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. 23 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार करण्यात आले. या 23 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2020-21 या वर्षामध्ये 98 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांचा इंगा; दोन दिवसांत 88500 रुपयांची दंडवसुली
पालघरमध्ये मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला, बीचवर पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
(Pune Goon Akshay Kiratkirve Rahul Pappu Wadekar Murder on same day)