पुणे : वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून एका मुलानं आपल्या सावत्र आईची हत्या (mother killed by son) केली होती. या हत्येप्रकरणी आरोपी मुलगा फरार होता. गेल्या तीन आठवड्यांपासून या मुलाचा पोलिसांकडून (Pune Crime news) शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांनी सावत्र आईच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर पोलिसांनी (Bhor Police) आरोपी मुलाला राजधानी दिल्लीत जाऊन अटक केली आहे. या 22 वर्षीय आरोपी मुलाचं नाव शिवम अंकुश शिंदे असं आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अकुंश शिंदे यांनी दुसरं लग्न होतं. याचा राग त्यांच्या मुलाच्या मनात होता. त्यातूनच त्याने आपल्या सावत्र आईची हत्या केली होती. धारदार शस्त्राने त्यांने सावत्र आईवर वार करत तिचा जीव घेतला होता. या हत्येप्रकरणी भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फरार असलेल्या मारेकरी मुलाच्या मागावर पोलीस गेल्या काही दिवसांपासून होते. अखेर आरोपी मुलगा शिवम शिंदे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
बावीस वर्षीय आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज येथे राहत होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो वडिलांच्या घरी भोर येथे आला होता. आरोपी शिवम शिंदे याच्या वडिलांनी शिवमच्या आईच्या मृत्यूनंतर रेश्मा शिंदे ह्यांच्याशी विवाह केला होता.व डिलांनी दुसरं लग्न केल्याचा आरोपीच्या मनात राग होता. वडील रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत पहाटे सावत्र आई रेश्मा अंकुश शिंदे ह्यांची त्याने झोपेत असताना गळा चिरून आणि नंतर दगडी वरवंटा डोक्यात घालून निर्घृन हत्या केली होती.
खुनानंतर आरोपी शिवमने घरातून पलायन केलं होतं. खून झाला त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिथून पलायन केलं. मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा (वय 18) यांनी याबाबत भोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
सावत्र आई रेश्मा शिंदेचा खून केल्यानंतर शिवम हा कोल्हापूर, आंध्रप्रदेश,तिरुपती, तेलंगणा, ओडिसा, मुंबई, मध्यप्रदेश, हरियाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिला होता. गेल्या 23 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतल्या एका मिठाईच्या दुकानात पार्सल पोहचवण्याचं कामं करत असल्याचं पोलिसांना समजले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे भोर पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्यात. ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक शेळके, विकास लगस, अजय साळुंखे, दत्तात्रय खेंगरे, चेतन पाटील, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके यांनी केलीय. आता अटक करण्यात आलेल्या आरोपी शिवम शिंदे यांची पोलिसांकडून कसून चौकशी केला जातेय.