पुणे : पुण्यातील फुरसुंगी येथे एका इंजिनिअर पतीने आपल्या इंजिनिअर पत्नीचा जीव घेतला. या धक्कादायक हत्याकांडप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनिअर पतीचं नाव राजेंद्र गायकवाड असं आहे. तर हत्या करण्यात आलेल्या पत्नीचं नाव ज्योती गायकवाड असं आहे. ज्योती 28 वर्षांची असून आरोपी पती राजेंद्रचं वय 31 वर्ष होतं. दोन वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. नुकतीच ज्योती बाळंतपणानंतर घरी आली होती. चाकूने वार करत राजेंद्रने पत्नी ज्योतीचा खून केला. या हत्येचं धक्कादायक कारणही समोर आलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द पतीने आपण हे कृत्य केलं असल्याचं सांगितल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर पतीपत्नी एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात भांडणं सुरु झाली होती. जूनमध्ये ज्योतीचं बाळंतपण झालं होतं. त्यानंतर ती पहिल्यादाच फुरसुंगी येथील घरी आली होती.
सोमवारी सकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. राजेंद्र याला ज्योतीच्या चारीत्र्यावर संशय होता. इतकंच काय तर तो तिचा पगारही स्वतःकडे घ्यायचा. शिवाय तिला माहेरुनही पैसे आणायला लावत होता, असाही आरोप करण्यात आला आहे.
राजेंद्रने सोमवारी झालेल्या वादातून धारदार चाकूने ज्योतीवर सपासप वार केले. यात ज्योती गंभीर जखमी झाली. ही बाब राजेंद्र याने स्वतःच घरमालकाला सांगितली. त्यानंतर घरमालकानं पोलिसांना याबाबत कळवलं आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमी अवस्थेत असलेल्या ज्योतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. जखमी ज्योतीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ज्योतीची हत्या केल्याप्रकरणी तिचा पती राजेंद्रला अटक केली असून त्याची आता कसून चौकशी केला जाते आहे. मात्र या घटनेनं अवघ्या काही महिन्यांचं असलेलं त्याचं बाळ मात्र पोरकं झालंय. आता या हत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय.