कॉपी बहाद्दराची एवढी हिंमत? परीक्षा केंद्रात मुन्नाभाई स्टाईल कॉपी, पण अतिशहाणपणाच नडला, नेमकं काय घडलं?
लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस परीक्षा आता वादात सापडली आहे.
पुणे : ‘मुन्नाभाई MBBS’ हा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला आहे. या चित्रपटात मुन्नाभाई परीक्षेत पेपर लिहिताना मोबाईलवर आपल्या मित्रांची मदत घेऊन कॉपी करतो. तो ज्याप्रकारे कॉपी करतो अगदी त्याच पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुन्नाभाईला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खरंतर चित्रपट आणि खऱ्या आयुष्यात जमीन-आसमानचा फरक असतो. चित्रपट हे एक मनोरंजनाचं साधन असतं. चित्रपटांमध्ये चांगल्या गोष्टीही दाखवल्या जातात. पण चित्रपटात दाखवलेल्या नकारात्मक गोष्टी खऱ्या आयुष्यात अंगीकारलं तर त्याचं नुकसानच होतं. त्याचाच प्रत्येय पुण्यातील एका तरुणाला आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस परीक्षा आता वादात सापडली आहे. तसेच लोहमार्ग पोलीस याप्रकरणी मुळापर्यंत जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आरोपी उमेदवार हा लोहमार्ग परीक्षा गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील नायक देखील अशाप्रकारे कॉपी करत होता. पण खऱ्या आयुष्यातील या मुन्नाभाईला जेलची हवा खावी लागली. जीवन फंडुसिंग गुणसिंगे (रा. वैजापुर, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीसाठी रविवारी (17 ऑक्टोबर) लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रामध्ये जीवन गुणसिंग याचा परीक्षेसाठी नंबर आला होता. तो दुपारी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते.
गुणसिंग कॉपी नेमका कसा करत होता?
गुणसिंगने परीक्षा सुरु झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईद्वारे मित्राला संपर्क साधला. मित्राला प्रश्न सांगून त्याच्याकडून उत्तर ऐकून लिहित होता. उत्तरे लिहित असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी गॅझेट जप्त करुन त्याला अटक केली. हे एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस असून त्यामध्ये सिमकार्ड टाकून कॉल करण्याची सोय होती. याद्वारे तो कॉपी करत होता. पोलीस या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक औरंगाबादकडे रवाना करण्यात आलं आहे.
पोलीस भरती परीक्षेत कॉपीचा भयानक प्रकार
दुसरीकडे जळगावात काही दिवसांपूर्वी पोलीस भरती परीक्षेत कॉपीचा असाच काहिसा भयानक प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. कॉपी करताना अटक करण्यात आलेला योगेश आव्हाड नाशिकमधील तर प्रतापसिंग गुलचंदहा औरंगाबाद जिल्ह्यातील रहीवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज या परीक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड याने केंद्राच्या आवारातील सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेरे तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांची नजर चुकवली. त्याने कॉपी करण्यासाठी मोबाईल परीक्षा केंद्रात नेला होता. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मित्राच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. ढळढळीतपणे कॉपी करुन आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
एटीएम कार्डच्या आकाराचे यंत्र वापरले
तर दुसरीकडे विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतापसिंग बालोद याने एटीएम कार्डच्या आकाराचे एक डिव्हाईस सोबत आणले होते. त्यात मेमरी कार्ड होते. ते ब्लूटूथने कनेक्ट करून स्पीकरमधून आवाज दिला होता. लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव त्याला ऐकू येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रतापसिंग हा परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याने बनियनमध्ये डिव्हाइस लपवले होते. पण परीक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा :
ऐसे फस गए जाल में… चोरीचा माल विक्रीसाठी गेल्या अन् औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात फसल्या
शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला