2 PI आणि 3 API निलंबित, पुणे पोलीस आयुक्तांची सर्वात मोठी कारवाई
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. आयुक्तांनी 2 PI आणि 3 API निलंबित केले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईनंतर पुणे पोलिसात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोयता गँग दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात या कोयता गँगच्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आलं आहे. पण कोयता घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपींचं प्रमाण काही कमी होतानाच दिसत नाही. नुकतंच एका मुलीला मारण्यासाठी भर दिवसा एक तरुण कोयता घेऊन तिच्या पाठीमागे पळत सुटला होता. पण दोन तरुणांनी या तरुणाला हटकल्याने मोठी दुर्घटना टळली. पण या घटनेनंतर पोलीस प्रशासनही खळबळून जागी झालं आहे. पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण पुण्यात योग्य दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पोलिसांवरील निलंबनाच्या कारवाईचा धडाकाच सुरु आहे.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना दुसरा दणका दिला आहे. पोलीस आयुक्तांनी 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षकांसह 7 जणांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. कामामध्ये हलगर्जीपणा करणार्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकंतच सहकारनगर पोलीस ठाण्यामधील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांना निलंबित केलं होतं. आयुक्तांच्या या कारवाईला काही तास झाले असतानाच आयुक्तांनी हा दुसरा दणका दिला आहे.
…म्हणून केली कारवाई
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामधील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जण निलंबित करण्यात आलं आहे. मोक्का कारवाईबाबत संदिग्ध आणि अत्यंत मोघम अहवाल देवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी ‘या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केली कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगड सायप्पा हाके पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे पोलीस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे पोलीस नाईक सचिन, संभाजी कुदळे