Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांमध्ये संतापाची लाट, पोलीस अॅक्शन मोडमध्ये
डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. विशेष म्हणजे या प्रकरणी आता पोलीसदेखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
पुणे : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. विशेष म्हणजे या प्रकरणी आता पोलीसदेखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय. याच व्हिडीओ प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. अनेकांनी गौतमीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी आता पोलीसही कामाला लागले आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवातदेखील केल्याची माहिती समोर आलीय.
गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गौतमीचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी सोबत ही धक्कादायक घटना घडली होती. आता या सगळ्या प्रकारांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
राज्य महिला आयोगाकडून दखल
विशेष म्हणजे गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून गंभीरपणे दखल घेण्यात आलीय. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरवर याबाबतची माहिती दिली आहे.
“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
“लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे”, असं चाकणकर यांनी सांगितलं.
“एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
गौतमीच्या बदनामीचा प्रयत्न?
गौतमी पाटील ही तरुणी अतिशय सर्वसामान्य घरातून पुढे आलीय. गौतमी जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली तेव्हा तिच्या काही आक्षेपार्ह डान्स स्टेप्समुळे ती टीकेला कारण ठरली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीरपणे माफी मागितली होती. पण त्यानंतरही गौतमीचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून केले जात होते, असं गौतमीच्या चाहत्यांचं आणि तिचं स्वत:चं देखील मत आहे.
गौतमीच्या डान्समुळे आणि प्रसिद्धीमुळे अनेकांची दुकानं बंद झाल्याचा दावा तिच्या चाहत्यांकडून केला जात होता. या दरम्यान तिचा चेजिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला. संबंधित व्हिडीओ तिला नकळत तयार करण्यात आलाय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित व्हिडीओ पुढे शेअर करु नका, असं आवाहन अनेकांकडून करण्यात आलं. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.