Pune : वानवडी बलात्काराची धडकी भरवणारी माहिती, 13 वर्षीय मुलीवर 14 जणांकडून बलात्कार, आतापर्यंत 17 जणांना बेड्या
Pune Wanwadi gangrape : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता.
पुणे : पुण्यातील वानवडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात दररोज धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. 13 वर्षीय पीडितेवर केवळ पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचे आता समोर आलं आहे. वानवडी पोलीस करत असलेल्या तपासाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. वानवडी पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झालं आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी आणखी सहा जणांना अटक केली होती. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तेव्हा तब्बल 13 इतकी झाली होती. तर बलात्कार झाल्याचे माहिती असूनही तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली. आता या सर्व आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आतापर्यंत कोणाकोणाला अटक?
वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसापूर्वी दोन लॉज मॅनेजरला ताब्यात घेतलं होतं. दोन लॉज मॅनेजर धरुन एकूण आरोपींची संख्या 16 वर गेली होती. तर प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) या अटकेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून निलंबित करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.
दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 16 वर गेली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पीडितेची पोलिसात तक्रार
संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.
संबंधित बातम्या :
Pune Crime | वानवडीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबित