पुणे : पुण्यातील मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो (MINTSD) मध्ये प्रशिक्षण घेत असलेली महिला आर्मी ऑफिसर बुधवारी सकाळी तिच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिस अधिकाऱ्यांनी आत्महत्येचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील वानवडी भागात मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो (MINTSD) ही प्रशिक्षण संस्था आहे. इथे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पॅरा मिलिटरी फोर्स, नागरी गुप्तचर संस्था यामधील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आत्महत्या केलेली लेफ्टनंट कर्नल दर्जाची महिला आर्मी ऑफिसर 43 वर्षांची होती.
पोलिसांकडून तपास
एका पोलीस अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी आस्थापनेच्या आवारात तिच्या अधिकृत निवासस्थानी मृतावस्थेत आढळली होती, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाविषयी लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली जाईल.
नागपुरात भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास
दुसरीकडे, भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेतला. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला होता. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला.
काय आहे प्रकरण?
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबा नगर परिसरात मुकेश रिझवानी यांचे घर आहे. 2019 साली ज्यावेळी कोरोना नागपूरमध्ये धुमाकूळ घालत होता, त्यावेळी घर मालक मुकेश रिझवानी यांनी राजेश सेतीया नामक इसमाला घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या.
घरमालकाला जीवे मारण्याची धमकी
या काळात राजेश सेतीया यांनी घर मालक मुकेश रिझवानी यांना घर भाडे देणे अपेक्षित होते, मात्र ज्यावेळी मुकेश हे राजेश सेतीया यांच्याकडे घरभाडे मागण्यासाठी गेले तेव्हा राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी मुकेश रिझवानी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
घर रिकामं करण्यासाठी साडेचार लाखांची मागणी
आरोपी भाडेकरु राजेश सेतीया हा मुकेश यांना वारंवार धमकी देत होता. घर रिकामे करून हवे असले तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी सेतीया याने मुकेश यांच्याकडे केली. घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने घर रिकामे करण्याऐवजी आणखी पैसे मागितले.
भाडेकरुकडून सुरु असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
भाडेकरुवर आरोप, व्हिडीओ व्हायरल
घरमालक मुकेश यांना भाडेकरु राजेश सेतीया हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता, त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक दडपणाखाली वावरत होते. राजेश घर रिकामे करत नसल्याने मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी मुकेश यांनी एक व्हिडीओ तयार केला, ज्यामध्ये त्यांनी भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा सांगून तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
संबंधित बातम्या :
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या
पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत