तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो म्हणत पुण्यात महिलेला लुबाडले, 29 लाखांचा गंडा
एका 62 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत एका ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात ही घटना घडली. एका भोंदू बाबाने ज्येष्ठ महिलेला 29 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका 62 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या एका ज्येष्ठ महिलेला डिसेंबर महिन्यात अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या घरात दोष असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्या भोंदू बाबाने या महिलेला तुमच्या घरात वास्तुदोष आहे, तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो, अशी खोटी बतावणी केली. यानंतर त्या भोंदू बाबाने महिलेला घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही पूजा कराव्या लागतील असे सांगितले. यानंतर त्या महिलेला ऑनलाईन पद्धतीने पैसे देण्यास सांगितले.
यानंतर त्या महिलेने आरोपीच्या बँक खात्यात वेळोवेळी काही रक्कम जमा केली. अशाप्रकारे या महिलेने त्याच्या अकाऊंटमध्ये २८ लाख ७७ हजार रुपये जमा केले. मात्र त्यानंतर जेव्हा त्या महिलेने त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र समोरुन काहीही उत्तर आले नाही. यानंतर मात्र त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्या महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस या भोंदू बाबाचा शोध घेत आहेत.