CCTV Video : खेड-शिवापूरमधील धाडसी दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, श्री गणेश ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
खेड-शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथकं रवाना करण्यात आली आहेत.
पुणे : सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरच्या श्री गणेश ज्वेलर्सवर चार जणांनी सशस्त्र दरोडा (Robbery) टाकल्याची घटना काल रात्री घडली आहे. ज्वेलर्ससह शेजारच्या सलून दुकानात गोळीबार (Firing) करत, दुकानातील काचांची तोडफोड (Vandalise) करत सोनं लुटून तिथून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोड्याची सर्व थरारक आणि अंगावर काटा आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मागच्याच आठवड्यात याचं परिसरातील एटीएम, चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास केली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद
सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथे श्री गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात काल रात्री 9 च्या सुमारास 5-6 दरोडेखोर हत्यारे घेऊन घुसले. चोरट्यांनी दुकानात उपस्थित दुकान मालक आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोने लुटले. सर्व दरोडेखोर हातात कोयता, बंदुका घेऊन दहशत पसरवताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. लूट केल्यानंतर चोरट्यांनी हातालील कोयत्याने दुकानाच्या काचा फोडल्या. इतकेच नाही तर ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या सलूनच्या काचाही आरोपींनी फोडून टाकल्या. तसेच गोळीबारही केला. त्यानंतर परिसरात कोयते आणि बंदुका दाखवत दहशत निर्माण केली आणि सोने घेऊन पसार झाले.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
खेड-शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरोड्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळते. ज्वेलर्स दुकानाचे मालक धुकसिंग राजपूत यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. (Robbery incident in jewelers in Khed-Shivapur caught on CCTV camera)