Pune Crime : मातृत्वाला काळिमा फासणारी घटना, जन्म होताच नकोशीला कचऱ्यात फेकले !
या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत. वंशाला दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला कचराकुंडीत सोडून दिले.
मंचर/पुणे : आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली आहे. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या जन्मदात्या आईला CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी शोध घेऊन अटक केली. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा नारा बुलंद केला जात आहे. तर दुसरीकडे मुलगी झाली की तिला नकोशी केलं जातंय. ‘आई गं.. तु वैरान का गं झालीस …!’ हेच शब्द तोंडातून येत जरी नसले तरी डोळ्यात मात्र सहज दिसत होते.
कचरा कुंडीत पिशवीत घालून फेकले बाळाला
पुणे जिल्ह्याच्या मंचर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मुख्य बाजार पेठेत नवजात स्री जातीचे अर्भक पिशवीत घालून कचऱ्याच्या कुंडीत फेकून देण्यात आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक तरुणांनी अर्भकाला रुग्णालयात नेले
काही स्थानिक तरूणांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत मंचर पोलिसांना याची माहिती देण्यात आले. या बाळाची तब्बेत आता चांगली असून त्याच्यावर ग्रामीण रूग्नालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आईला अटक
यानंतर मातेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला अटक केली आहे.
महिलेला चौथीही मुलगीच झाल्याने केले हे कृत्य
या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत. वंशाला दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला कचराकुंडीत सोडून दिले. पण नशीब बलवत्तर आणि स्थानिकांना या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने या मुलीला जीवदान मिळाले.