पुणे : दररोज शिवीगाळ करत मानसिक त्रास देणाऱ्या तरुणाचा चुलत भावांनी मिळून काटा काढल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याशाठी मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरला. पुण्यातील पानशेत जवळील आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीत ही घटना घडली. विजय प्रफुल्ल काळोखे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. नितीन रामभाऊ निवंगुणे आणि विजय दत्तात्रय निवंगुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणारा विजय काळोखे हा नितीन निवंगुणे याला जुन्या वादातून शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होता. मयत तरुणाने आरोपींना पुण्यात भेटायला बोलावले होते.
विजयला भेटल्यानंतर विजय निवंगुणे आणि नितीन निवंगुणे हे आपल्या दुचाकीवरुन पुण्यातून गावच्या दिशेने चालले होते. विजयही त्यांच्या मागोमाग निघाला. याचदरम्यान आंबी रस्त्यावरील रानवडी येथून जात असताना नितीन निवंगुणे याच्या शेतातील पत्र्याचे कंपाउंड उघडे दिसले.
नितिन कंपाऊंडचे दार बंद करण्यासाठी तेथे थांबला. त्यावेळी विजय काळोखे हा देखील त्याच्या मागोमाग कंपाउंडमध्ये आला. तिथंही विजय काळोखे हा नितीन याला शिवीगाळ करू लागला. नितीन याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगूनही तो शिवीगाळ करत होता.
यावेळी नितीन याचा चुलत भाऊ विजय निवंगुणे हा तेथे आला. त्याने नितीन आणि मयत विजय काळोखे यांच्यातील भांडणे पाहून काय झाले, असे विचारले. त्यावेळी मयत विजय काळोखे हा विजय निवंगुणे यास शिवीगाळ करू लागला. त्यामुळे रागात विजय निवंगुणे याने शेजारी पडलेली वीट विजय काळोखे याच्या डोक्यात घातली.
यानंतरही विजय काळोखे हा शिवीगाळ करत या दोघांवर धावून आला. यामुळे संतापलेल्या नितीन आणि विजय निवंगुणे यांनी लोखंडी अँगल आणि रॉडने विजय काळोखे याला बेदम मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केली.
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी एक वर्षापूर्वी खोल खोदलेला होता. त्या खोल खड्ड्यात विजय काळोखे याचा मृतदेह पुरून ठेवला होता आणि त्यावर गवत टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पानशेत येथील पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांना खबऱ्याकडून रानवडी येथे एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शिंदे घटनेचा तपास सुरु केला असता त्यांना सदर ठिकाणी मृतदेह आढळला.
याप्रकरणी शिंदे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवत मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर सखोल तपास करत पोलीस आरोपींपर्यंत पोहचले आणि हत्या करणाऱ्या दोन्ही भावांना अटक केली.