पुण्यात काचेच्या पतंगाचा मांजा विकणं कधी बंद होणार, आणखी किती लोकांचे गळे कापण्याची वाट पाहणार
श्रीकांत हे मोटारसायकलने सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाड्याजवळ त्यांच्यासमोर मांजा आला. त्या मांजाने त्यांचा गळा कापला.
पुणे : शहरात आणखी एकाचा पतंगाच्या काचेच्या मांजामुळे गळा कापला गेला आहे. देशात आणि राज्यातही या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारचा मांजा विकण्यास बंदी आहे, तरी देखील याची निर्मिती ही चीनमध्येच नाही, तर देशात देखील केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. काहींची मान, तर काहींचा कान आणि नाक कापण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बाईक चालवताना हा मांजा दिसत नाही, मात्र काही वेळाने वेगानुसार गळा कापला जातो. पशुपक्ष्यांना होणाऱ्या इजेएवढंच हे देखील गंभीर आहे. काचेच्या मांजाने गळा कापण्याच्या आणखी घटना वाढल्या, तर बाईक चालवणारा कधी कुठे जीव गमावून बसेल हे सांगता येणार नाही, म्हणून असा घातक मांजा विकणाऱ्यांवर बंदी आणण्याची मागणी होत आहे.
व्यावसायिकाचा गळा कापला
संक्रातीनिमित्त पतंग उडविले जाते. पतंग उडवित असताना नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जातो. पुण्यात या नायलॉन मांजामुळं एका व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ही दुर्घटना वारजे येथील ढोणेवाड्याजवळ रविवारी घडली.
जांभूळवाडी येथील निखिल लिपाणे यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. श्रीकांत हे मोटारसायकलने सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाड्याजवळ त्यांच्यासमोर मांजा आला. त्या मांजाने त्यांचा गळा कापला.
जखमी रुग्णालयात दाखल
गळा कापल्याने जखमी श्रीकांत यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णावर उपचार सुरू आहेत. या मांज्यामुळे काही पक्षीदेखील जखमी झालेत. त्यांच्यावरही उपचार करण्यात आले.
मांजाने गळा कापल्याने रस्त्याने जाताना बाईकचालकांना सांभाळून गाडी चालवावी लागत आहे. मांजा समोर स्पष्ट दिसत नसल्यानं अशा घटना घडतात. असा हा घातक मांजा विकण्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रविवारी घडलेली ही घटना ताजी आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळं बाईकस्वारांनी सावध होऊन गाडी चालविणे आवश्यक आहे.