Video: दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास
पहाटेच्या सुमारास तब्बल साडे पाचशे लिटर दूध चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. Pune Kondhava milk stolen
पुणे: आत्तापर्यंत आपण कपडे, भांडी किंवा कधीतरी किराणा दुकानातून वस्तू चोरीला गेल्याचे ऐकले असेल. तर काही महिन्यांपूर्वी दवाखान्या सारख्या ठिकाणीही चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. पण, पहाटेच्यावेळी दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमधील दूधाच्या पिशव्या चोरीला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का? नाही ना. पण हे घडलेय. तेही कोंढवा परिसरामध्ये एक, दोन लिटर नव्हे, पहाटेच्या सुमारास तब्बल साडे पाचशे लिटर दूध चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. बरं, दूध चोरुन नेण्याचा हा प्रकार एक रिक्षाचालक करत असल्याचे आता पुढे आले आहे. (Pune Kondhava area auto driver theft five hundred fifty litre milk stolen)
नेमकं काय घडलं?
कोंढवा परिसरामध्ये दूध वितरक योगेश लोणकर हे अनेक दुकानदारांना पहाटेच्यावेळी दूध वितरण करण्याचे काम करतात. दररोज पहाटे दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमध्ये दुकानांच्या मागणीनुसार दूधाच्या एक, दोन लिटरच्या दूधाच्या पिशव्या टाकल्या जातात. मात्र काही दिवसांपासून दुकानदारांनी मागणी केलेल्या दूधापेक्षा त्यांना दुधाच्या पिशव्या कमी मिळत असल्याच्या तक्रारी लोणकर यांच्याकडे येत होत्या. लोणकर यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी मागणीनुसार पिशव्या टाकल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र दुकानदारांना कमी पिशव्या मिळत असल्याने त्यांना संशय आला.
लोणकर यांनी माहिती घेतल्यानंतर कोंढवा परिसरातील सात दुकानांमधून मागील सहा महिन्यात लब्बल 546 लिटर दूध गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 13 फेब्रुवारीला दुकानांसमोरील क्रेटमधून 102 लिटरच्या दूधाच्या पिशव्या गायब झाल्याचे दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर 12 मार्चला एका दुकानातून 116 लिटर दुधाच्या पिशव्या चोरीला गेल्या. त्यानंतर 1 एप्रिलला 124 लिटर, 7 एप्रिलला 48 लिटर दूधाच्या पिशव्यांची चोरी झाली.
सीसीटीव्हीत चोरी कैद
दुकानदारांनी तक्रारी केल्यानंतर लोणकर यांनी या प्रकरणाचा मागोवा घेतला. त्यावेळी तीन महिन्यांपूर्वीही दोन दुकानांमधून 156 लिटर दूधाच्या पिशव्या चोरीला गेल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीद्वारे तपासणी केली. तेव्हा पहाटेच्या सुमारास एक रिक्षाचालक कोंढवा परिसरात येऊन दूधाच्या पिशव्या चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रिक्षाचालक हा या पिशव्यातील दूध अन्यत्र विकत असावा किंवा दूध भेसळीच्या रॅकटेमध्ये सहभागी असावा असा अंदाज कोंढवा पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या:
जिल्हाधिकाऱ्यांना रक्त देवून विरोध; पुण्यातील रिक्षा चालकांचं अनोखं आंदोलन
भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली
(Pune Kondhava area auto driver theft five hundred fifty litre milk stolen)