पुण्यातील शिरुरमध्ये सध्या एकाच गोष्टीचं टेन्शन वाढलं आहे. शिरुरमध्ये अवघ्या महिन्याभरात पाच लोक अचानक बेपत्ता झाले आहेत. कुणाला काहीही न सांगता घरातून निघून जाण्याचं हे प्रमाण वाढलं आहे. यात महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अचानक हे लोक गायब होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर तालुक्यात या घटनेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
जुने शिरुर (रामलिंगम) या भागातून सुमन सखाराम साळवे ही 44 वर्षाची महिला तिचा मुलगा जीवन सखाराम साळवे वय 18 याच्यासोबत गायब झाली आहे. रविवारी सकाळी सुमन आणि तिचा मुलगा जीवन सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. पण रात्री उशीर जाला तरी दोघेही घरी आले नाही. सुमन हिने पती सखाराम साळवे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता. शााळेतील शिक्षक व कर्मचारी त्रास देत असल्याने आम्ही निघून जात आहोत, असं या मेसेजमध्ये म्हटल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सखाराम यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक एन.बी. शिंदे या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सोनार आळीतून तरुणी बेपत्ता
शिरूर शहरातील सोनार आळीतून प्रतिक्षा वैभव शहा ही 20 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. ही मुलगी 23 जुलैपासून बेपत्ता आहे. तिचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलीस कसून तपास करत आहेत.
इन्स्टाग्रामवर ओळख अन्…
शिरूरच्या बागवान नगरमधील एक अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाली आहे. इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्याच्यासोबत ही मुलगी चॅटिंग करायची. त्यामुळे आई रागवल्याने ती घर सोडून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजी मार्केटमधून गायब
मनिषा राजेंद्र शुक्ला ही 35 वर्षाची महिला शिक्रापूर येथून गायब झाली आहे. भाजी मार्केटमध्ये गेलेली मनिषा परत आलीच नाही. कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली. कुटुंबीयांनी नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी सर्वांना विचारून पाहिले, पण कुणाकडेही मनिषा दिसली नाही. या महिलेच्या कानात सोन्याची रिंग आहे, गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे, पायात पैंजण आणि जोडवे आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
नोकरीसाठी गेला तो आलाच नाही
पुण्यातही एक तरुण अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे. बुद्धभूषण पठारे असं या तरुणाचं नाव आहे. तो 24 वर्षाचा असून एमपीएससीचा विद्यार्थी आहे. मंत्रालयात नोकरी लागल्याचं त्याने घरी सांगितलं होतं. त्यानंतर तो गायब झाला. आज तीन महिने झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. हा तरुण कुठे गेला? कुणासोबत आहे? त्याचं काय झालं? याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड टेन्शन आलं आहे.
बुद्धभूषण हा मूळचा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील आहे. तो पुण्यात गेल्या चार वर्षापासून एमपीएससीची तयारी करतो. पुण्यातील गांजवे चौकातील परिसरात एका इमारतीत राहतो. मे महिन्यात त्याने घरी फोन करून मंत्रालयात नोकरी लागल्याचे सांगितले. त्यानंतर तो मुंबईत आला. पण तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्याचा फोन लागत नाही. व्हॉट्सअप बंद आहे. त्याच्या वडिलांनी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा कुटुंबीयांना अचानक व्हॉट्सअपवर मेसेज आला. आपण डिप्रेशनमध्ये आहोत, असं त्याने सांगितलं. पण तो नेमका कुठे आहे? हे अद्यापही समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.