काय सांगता राव ? 300 कोटींचा गंडा आणि तो ही पुणेकरांना; एक नाही दोन नाही तब्बल दोनशे पुणेकरांना चुना लावणारा कोण?
एक-दोन नाही तब्बल दोनशे पुणेकरांना गंडा घालण्यात आला आहे. आणि काही लाख नाहीतर तब्बल तीनशे कोटी रुपयांची फसवणूक करून एक ठकसेन फरार झाला आहे.
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोनशे जणांची 300 कोटी रुपयांना यामध्ये फसवणूक झाल्याचे समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. कंपनीचे संचालक सेलवाकुमार नडार यांच्याविरोधात आत्तापर्यन्त 26 जणांनी तक्रार केली आहे.
अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटचे संचालक सेलवाकुमार नडार फेब्रुवारी महिन्यापासूनच फरार असल्याचे समोर आले आहे. तब्बल दोनशे पुणेकरांना गंडा घालून फरार झालेल्या नडारची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.
हडपसर येथे एका कंपनीत मॅनेजर पदावर असलेल्या सचिन पुरोषोत्तम पवार यांनी बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मूळचा कोंढवा परिसरात राहत असलेल्या नडार यांच्या कंपनीतून त्यांना 2018 मध्ये फोन आला होता. त्यांना तुमचे कर्ज आम्ही भरू त्यासाठी काही ठेवी ठेवाव्या लागतील.
खरंतर पवार यांच्या नावावर दोन कर्ज होते. एक कारचे आणि दुसरे पर्सनल असे दोन वेगवेगळ्या दराने कर्ज होते. पण, अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून त्यांना 6 ते 7 टक्के दराने कर्ज मिळणार असल्याचे सांगितल्याने त्यांनी लागलीच विश्वास ठेवला.
अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून खरंतर वेगवेगळ्या कंपनीत आमची कंपनी पैसे गुंतवत असून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून तुमचे हप्ते भरणार असल्याचे सांगून विश्वास संपादक करीत होती. त्यामध्ये काही हप्ते सुद्धा कंपनीने भरले होते. त्यानंतर मात्र हप्ते भरण्यास नकार दिला.
काही तक्रारदारांनी तर दुसऱ्या बँकेतून कर्ज काढून अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे ठेवले होते. त्यातून काही हप्ते भरले गेल्याने त्यांना मोठा फायदा होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आणखी रक्कम भरली मात्र नंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
आत्तापर्यन्त 36 जणांनी तक्रार दिली असून त्यांची रक्कम 7 कोटीच्या वर केली आहे. तर दुसरीकडे दोनशेहून अधिक जणांची फसवणूक झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे पुणेकरांची फसवणूक झाल्याचं समोर आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.