पुणे / विनय जगताप : पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण परिसरात तरुणासोबत फिरायला जाणं तरुणीच्या जीवावर बेतलंय. भोरमधील नीरा नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या तरुणीचा अचानक तोल गेला आणि ती पाण्यात पडली. धरणातून पाणी सोडलेलं असल्यानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी नीरा नदीत शोधकार्य सुरू आहे. हा अपघात की घातपात याबाबतही पोलीस शोध घेत आहेत. सदर तरुणी सातारा जिल्ह्यातीव खटाव तालुक्यातील असून, मित्रासोबत भाटघर धरण परिसरात फिरायला आली होती.
भोर येथील भाटघर जलाशयाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या वेळवंड आणि नीरा नदीच्या संगमाजवळ ही घटना घडली. खटाव (जि.सातारा) येथील तरूणी पाण्यात पडून बुडाली. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. परंतु मंगळवार सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह सापडला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. बुधवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी धरणातून उन्हाळी आवर्तन पाणी सोडलेले असल्याने पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. संबंधित तरुणाने भोर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर दिली. त्यावेळी भोर पोलीस घटनास्थळी संबंधित तरुणासोबत घटनास्थळी दाखल झाले.
भाटघर धरणाखालील घटनास्थळ हे सातारा जिल्ह्यातील शिरवळ (ता.खंडाळा) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळवले. भोर पोलीस, शिरवळ पोलीस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.