Pune News : बॉसने Whatsapp ग्रुपवरून काढलं, रागावलेल्या कर्मचाऱ्याने बॉसला बांबूनेच झोडपलं, आयफोनही फोडला
पीडित बॉसने पोलिसांत धाव घेत आरोपी कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या कर्मचाऱ्याने केवळ बॉसलाच मारहाण केली नाही तर त्याने ऑफीसमध्येही तोडफोड करत मोठं नुकसान केलं. एवढंच नव्हे तर त्याने बॉसचा आयफोनही मोडून चक्काचूर केला.
पुणे | 8 डिसेंबर 2023 : दिवसेंदिवस फोन, सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलाय. व्हॉट्सॲप हे तर लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढलाय, तसे त्याचे तोटेही दिसू लागले आहेत. लोकांची पेशन्स लेव्हल कमी होऊन इरिटेशन वाढलं आहे. त्यामुळे रागाच्या भरात कोणीहीह काहीही करून बसू शकतं. याच रागाचा उद्रेक होऊन पुण्यात एक भयानक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पुणे जिल्ह्यात कंपनीचा कर्मचारी आणि बॉस यांच्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.
बॉसने कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने कर्मचारी दुखावला. आणि त्याने त्याच रागाच्या भरात ऑफीसमधील सर्व कर्मचाऱ्यांसमोरच बॉसला काठीने मारहाण केली. एवढचं नव्हे तर त्या संतप्त कर्मचाऱ्याने कार्यालयाची तोडफोड करत बॉसचा आयफोनही फोडला. ही संपूर्ण घटना पुण्यातील चंदन नगर येथील मुंडवा रोड जवळील एका कंपनीत घडली.
व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागाचा उद्रेक
मिळालेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीचे मालक अमोल शेषराव ढोबळे (वय 31) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते मूळचे लोहगाव येथील खांडवे नगर येथील रहिवासी आहेत. अमोल यांची इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनी असून त्यांच्याच कंपनीत काम करणारा सत्यम शिंगवी याने रागाच्या भरात हल्ला करून आपल्याला मारहाण केल्याचे अमोल यांनी तक्रारीत नमूद केले. बुधवारी त्यांनी चंदन नगर पोलिस स्टेशन गाठून सर्व प्रकार कथन करत सत्यम शिंगवी विरोधात तक्रार नोंदवली
नेमकं काय घडलं त्या दिवशी ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम हा इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनीत काम करतो. मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांशी त्याची वागणूक योग्य नव्हती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात बॉस अमोल याच्याकडे तक्रार केली होती. त्याच्या वर्तनावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाला होता. याचसंदर्भात बोलण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे सत्यम याला अनेकदा कॉल करण्याचा, त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. यामुळे अखेर बॉस अमोल ढोबळे याने सत्यमला कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून हटवले.
यामुळे सत्यम प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात ऑफीसमध्ये येऊन व्हॉट्सअॅप ग्रुपमधून का काढलं, याचा जाब अमोल यांना विचारला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने सर्व कर्मचाऱ्यांसमोरचं कंपनीचा मालक अमोल याला मारहाण करण्यास सुरूवात केली. बांबू घेऊन त्याने अमोलला मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्याने ऑफीसमधील सामानाचीही तोडफोड केली आणि अमोल यांचा महागडा आयफोनही तो़डून त्याचा चक्काचूर केला. या सगळ्या प्रकारानंतर ढोबळेंनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सिंघवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात चंदन नगर पोलिस स्टेशनमधील अधिकारी पुढील तपास करत आहेत.