पुणे | 21 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्ह्यांच्या घटना आणि तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भामट्यांकडून सामान्य, निष्पाप नागरिकांची लूटमार होण्याच्या अनेक घटना पुढे समोर येत आहेत. अशीच एक गुन्ह्याची घटना (crime news) उघडकीस आली आहे. पुण्याच्या भोरमध्ये एका बँकेत अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेला फसवून (cheating) तिचे हजारो रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने त्याने तब्बल 29 हजार रुपये हातचालाखीने (fraud news) लांबवले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नप्रभा बांदल असे पीडित वृद्ध महिलेचे नाव असून त्या 70 वर्षांच्या आहेत. भोर शहरातील राजवाडा चौकात असणाऱ्या जनता बँकेत त्या दुपारच्या सुमारासा गेल्या होत्या. तेथेच एका भामट्याने त्यांची फसवणूक करत पैसे चोरले. दुपारी १२ च्या सुमारास रत्नप्रभा बांदल या जनता बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. तेवढ्या त्यांच्या एक इसम पाठीमागे येऊना उभा राहिला. त्याने डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. हळूहळू त्या इसमाने बांदल आजी यांच्याशी बोलायला सुरूवात केली.
अशी केली फसवणूक
बोलता बोलता त्याने बांदल आजी यांना सांगितले की, तुमच्या स्लीपवर भरलेली जी माहिती आहे ती अर्धवट आहे. किती नोटा भरायच्या आहेत ते त्यामध्ये नमूद केलेले नाही. हे ऐकताच बांदल आजी गोंधळल्या, मात्र त्या इसमाने त्यांना धीर दिला आणि स्लीपवर पूर्ण माहिती मी भरून देतो असे सांगितले. त्या स्लीपमध्ये माहिती भरण्याच्या बहाण्याने तुमच्याकडे 500 आणि 200 रुपयांच्या किती नोटा आहेत असे विचारले. त्यानंतर त्या इसमाने नोटा नीट मोजण्यासाठी बांदल आजींकडून त्या घेतल्या आणि मोजून झाल्यावर स्लीपसकट त्या पुन्हा त्या आजींकडे दिल्या.
काऊंटवर गेल्यावर फसवणूक झाल्याचे आले लक्षात
त्यानंतर बांदल आजी या पुन्हा रांगेत उभ्या राहिल्या व त्यांचा नंबर आल्यानंतर त्या पैसे भरण्याच्याकाऊंटरवर गेल्या. मात्र तेथील कर्मचाऱ्याने त्यांच्या हातातील स्लीप तपासली व नोटा मोजल्या असता काही नोटा कमी निघाल्या. त्याने पुन्हा नोटा मोजल्या तरी तसेच दिसत होते. शेवटी त्याने बांदल आजी यांना याप्रकाराबाबत सांगितले. 500 रुपयांच्या 58 नोटा कमी असल्याचे त्याने सांगितले. त्या इसमाने हातचलाखीने त्या वृद्ध महिलेचे 29 हजार रुपये लुटल्याचे समोर आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर बांदल आजी यांनी व बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्या इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत तो तेथून फरार झाला होता.
त्यानंतर बांदल आजींनी बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि पोलिसांना यासंदर्भात कळवले आणि तक्रारही दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या भामट्याचा शोध घेण्यात येत आहे.