Pune Crime : भुरट्या चोरांचा धुमाकूळ, एका रात्रीत फोडली ५ दुकानं; पण..
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी शहरात गदारोळ माजवत धुमाकूळ घातला. त्यांनी एकाच रात्रीत पाच वेगवेगळी दुकांनं फोडत त्यामध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत
विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुण्यामध्ये सध्या गुन्ह्यांच्या (crime in pune) घटना आणि त्यांची तीव्रता प्रचंड वाढली आहे. रोज नवनवे गुन्हे समोर येत असल्याने त्यामुळे नागरिकांच्या मनात सुरक्षेबद्दल (security of citizens) प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी अद्यापही गुन्हेगारांना वेसण घालण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.
गुन्ह्याची अशीच एक घटना समोर आली आहे, ती पुण्यातील भोरमध्ये. तेथे चोरट्यांनी सध्या धूमाकूळ घातला आहे. बाईकवरून आलेल्या भुरट्या चोऱ्यामुळे भोरमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. बाईकवरून आलेल्या या चोरट्यांनी एकाच रात्रीत भोरच्या रामबाग परिसरातील 5 हार्डवेअरची दुकानं फोडल्याचे समोर आले आहे.
या चोरट्यांनी एका दुकानांमधून 25 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली असून काही महत्वाची कागदपत्रंही लांबवली आहेत. पण इतर चार दुकानांमध्ये मात्र त्यांना काहीच न मिळाल्याने त्यांना हात हलवत परत जावं लागलं आहे. विशेष म्हणजे हे चोर तोंडाला रुमाल बांधून आल्याने, ते सीसीटीव्ही मध्ये दिसत असले तरीही त्यांचा चेहरा मात्र स्पष्टपणे दिसत नाहीये. पोलिस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र चेहरा लपवलेल्या चोरांचा शोध काढण्यासाठी त्यांचाही कस लागू शकतो. मागील काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्यानं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गेल्या आठवड्यातही झाली होती चोरी , बाईकवरून आलेल्यांनी पळवली होती गळ्यातील चेन
गेल्या आठवड्यात गणशोत्सवादरम्यानही भोर येथे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी, नंबर प्लेट नसणाऱ्या बुलेटवरून आलेल्या चोरांच्या दुकलीने महिलांच्या पर्स आणि गळ्यातील चेन खेचून चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या चोरीमुळे सणाच्या उत्साहालादेखल गालबोट लागलं होतं.
भोर तालुक्यातील भोर-मांढरदेवी मार्गावर नंबर प्लेट नसलेल्या हिरव्या रंगाच्या बुलेटवर आलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केली. वेगगेवगळ्या परिसरातून त्यांनी तीन महिलांच्या हातातील पर्स आणि गळ्यातील सोन्याचे दागिने खेचले आणि ते फरार झाले. गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुख्य रहदारीच्या रस्त्यावर सुमारे अर्ध्या तासात तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात घबराट पसरली होती.