Pune Crime : पगार मागितला म्हणून मारहाण, जखमी कामगाराचा मृत्यू, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पगारावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश बोरसे , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : पगारावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी भिडे यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत इसम अविनाश भिडे हे शेखर महादेव जोगळेकर यांच्याकडे कामाला होते. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीमधील ऑफीसमध्ये भिडे हे मशिन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मात्र पगारावरून भिडे आणि जोगळेकर या दोघांमध्ये वाद झाला होता. यापूर्वीही शेखर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करून मारहाण करून ऑफिस मधून हाकलून दिले होते. त्यानंतर पगाराच्या मुद्यावरून एक सप्टेंबर रोजी आरोपींनी भिडे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये भिडे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच उपचारांदरम्यान भिडे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण त्यानंतर भिडे यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत जोगळेकर व इतर आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानुसार कंपनीचे मालक शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडव नगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रूपेश रवींद्र कदम, संतोष ऊर्फ बंटी दत्तात्रेय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह अन्य चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जगंन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अधिक तपास करत आहेत.