विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही काळापासून अनेक अजब घटना घडत आहेत. आता याच पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यात राहून एम पी एस सी करणारा विद्यार्थी ३ महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. मंत्रालयात नोकरी लागली असं त्याने पालकांना खोटंच सांगितलं आणि तेव्हापासून तो पुण्यातून बेपत्ता झाला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील अधिकारी अधिक तपास करत आहेत.
मंत्रालयात नोकरी मिळाली सांगून गेला तो आलाच नाही
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे. बुद्धभूषण हा मूळचा वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा रहिवासी आहे. गेल्या 4 वर्षांपासून तो पुण्यात एम पी एस सी परीक्षेची तयारी करण्यासाठी रहात होता. पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो त्याच्या मित्रांसोबत वास्तव्यास होता. तसेच नवी पेठेतील एका लायब्ररीमध्ये जाऊन तो अभ्यास सुध्दा करायचा.
मात्र मे महिन्यात त्याने अचानक त्याच्या पालकांना फोन केला आणि आपल्याला मंत्रालयात नोकरी मिळाल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर त्याच्या पालकांना खूप आनंद झाला. काही काळाने मुलाला भेटण्यासाठी त्याच्या पालकांनी मुंबई गाठली, त्याला फोनही केला, मात्र तेव्हा त्याचा मोबाईल बंद असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्याचा खूप शोध घेतला पण मुलगा काही सापडला नाही.
पोलिसांत तक्रार दिली अन् ट्विस्ट आला..
अखेर बुद्धभूषणच्या वडिलांनी मुलाच्या काळजीपोटी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार कथन करून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याचदरम्यान आणखी एक ट्विस्ट आला. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पालकांना मुलाच्या मोबाईलवरून एक व्हॉट्सॲप मेसेज आला. ‘ मी सध्या डिप्रेशन आहे’ असा उल्लेख त्या मेसेजमध्ये करण्यात आला होता.
यामुळे नेमका हा तरुण गेला कुठे, कोणाच्या संपर्कात तो आहे का ? त्याचे कोणाशी काही वाद झाले का? तसेच त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का ? असा संशय पोलिसांना आहे, याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे.