पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणी पुणे पोलिसांनी वेगाने कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करत आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्यांना उद्या कोर्टासमोर हजर करणार आहेत. तसेच या प्रकरणाचं गांभीर्य आणि मुलाचं वय पाहून त्याला अल्पवयीन न समजता प्रौढ समजलं जावं यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रकरणात आम्ही कुठेही कुचराई केली नाही. आम्ही कुठेही कमी पडलो नाही. कुणाला तसं वाटत असेल… एखाद्या लॉ फर्मलाही तसं वाटत असेल तर मी खुले आम चर्चा करण्यासाठी तयार आहे, असं आव्हानच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली. आम्ही या प्रकरणी पहिल्या दिवसापासून म्हणजे रविवारपासून कठोर कारवाई सुरू केली आहे, हे मी कालपण स्पष्ट केलं होतं. याप्रकरणात आयपीसीचे कलम 304 लावण्यात आलं आहे. कोर्टात बाल गुन्हेगाराला प्रौढ मानावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट 70 आणि 77 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पहिल्या दिवसापासून कायद्याशीर मार्गानेच कारवाई करत आहे, असा दावा अमितेश कुमार यांनी केला.
चर्चा करायला तयार आहोत
आम्ही या प्रकरणात कुठे तरी कमी पडतोय किंवा कुचराई होत आहे, असं कुणाला वाटत असेल, किंवा आम्ही व्यवस्थित पावलं उचलली नाहीत, असं कुणाला वाटत असेल तर, मी कालही जाहीरपणे सांगितलं की, या प्रकरणी कोणत्याही लीगल पॅनलसमोर आम्ही खुले आम चर्चा करण्यास तयार आहोत. पोलिसांनी जी पावलं उचलली आहेत त्यात काही कुचराई असेल किंवा त्यापेक्षा अधिक कडक भूमिका घ्यायला हवी होती असं कुणी आम्हाला सूचवत असेल तर आम्ही चर्चा करायला आणि त्या प्रकारची अंमलबजावणी करण्यास तयार आहे, असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
कुणाचाही दबाव नाही
या घटनेत दोन लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. या प्रकरणात आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, नाही, आणि या पुढेही राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पोलीस कायद्याच्या मार्गाने चालतात. आम्ही कायद्याने जाणार आहोत. या प्रकरणात लॉजिकल निष्कर्ष काढून पुढे जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे फोन
मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे फोन आले होते. पोलीस महासंचालकांशीही या गुन्ह्याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीही कडक कारवाई करण्याची सूचना दिली आहे. जनमानसात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही त्यासाठी पोलीस कडक भूमिका घेत आहेत. पोलीस कडक कारवाई करत नाही हा भ्रम आम्हाला दूर करायचा आहे. तीच शासनाचीही भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आयुक्तांना बडतर्फ करा
पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी त्यांचं विधान ऐकलं नाही. पण कोणत्याही प्रकारच्या लीगल एक्सपर्टने यावं आणि यापेक्षा अधिक चांगली कारवाई करायची गरज आहे, असं त्यांनी सांगावं. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही खुलेआम जनतेत जायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.