Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?, थेट डॉनला दिली सुपारी
पुण्यात पोर्श कारची धडक बसून झालेल्या अपघातात नवे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपमे गाडी चालवून दोघांचा जीव घेतला, त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभीमी असल्याचं समोर आलं आहे. अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याची माहिती समोर आली. अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी मालमत्तेच्या वादात छोटा राजनची मदत घेतली होती
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणामुळे रिअल इस्टेट व्यावसायिक अग्रवाल कुटुंब चर्चेत आहे. याप्रकरणी आता एक नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कायद्याशी खेळणे हे काही अग्रवाल कुटुंबीयांसाठी नवीन नाही, असे कळते. या कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आले आहे. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा त्यांच्या भावासोबत संपत्तीसंदर्भात वाद झाला होता. या वादात सुरेंद्र यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. एवढंच नव्हे तर राजनच्या गुंडांनी गोळीबार केला. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. आधी याप्रकरणी पोलिसांनी तपास केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
पुण्यात तीन दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या पोर्श कारने चिरडले होते. अपघातात एक मुलगी आणि एक मुलगा असा दोघांचा मृत्यू झाला होता. अनिश अवधिया (२४ वर्षे) आणि अश्विनी कोष्टा (२४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी होते आणि पुण्यात काम करत होते. या प्रकरणात जुवेनाइल कोर्टाने अल्पवयीन आरोपीला काही अटींसह जामीनावर सोडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.
एस.के अग्रवाल यांच्यावर हत्येचा आरोप
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. तर विशालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल (आरोपीचे आजोबा) यांनी छोटा राजनशी हातमिळवणी केली होती आणि काही मालमत्तेवरून त्याचा भाऊ आरके अग्रवाल यांच्याशी झालेल्या वादात छोटा राजनची मदत मागितली होती. या वादाबाबत बंड गार्डन पोलिस ठाण्यात सुरेंद्र याच्याविरुद्ध अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेंद्र यांनी आरके अग्रवाल यांचा मित्र अजय भोसले याची सुपारी दिली होती असा आरोप आहे. या घटनेत भोसले यांचा चालकही जखमी झाला. हे प्रकरण मुंबईच्या सत्र न्यायालयात प्रलंबित आहे
संपत्तीच्या वादातून छोटा राजनची घेतली मदत
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीचे आजोबा एसके अग्रवाल उर्फ सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. एसके अग्रवाल यांचा भाऊ आरके अग्रवाल यांच्यासोबत काही मालमत्तेवरून वाद झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी सुरेंद्रने छोटा राजनशी हातमिळवणी केली होती. इतकंच नाही तर या संदर्भात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी बँकॉकला जाऊन छोटा राजनचा गुंड विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याची भेट घेतल्याचा आरोप आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवरील सर्व खटले सीबीआयने एकत्र करून तपास केले आहेत. सर्व खटल्यांच्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष ट्रायल कोर्ट नेमण्यात आले आहे. पुण्यातील या प्रकरणातही एसके अग्रवाल आणि राजन आणि इतरांविरुद्ध २०२१ पासून खटला सुरू आहे.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
यापूर्वी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. नंतर ते सीबीआयकडे सोपवण्यात आले. गुन्हेगारी कट रचणे, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. शस्त्रास्त्र कायद्याची काही कलमेही लावण्यात आली आहेत. मात्र, छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सहभाग असूनही पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली नाही,असा प्रश्न अनेकांना पडला आहे.