पती-पत्नी सिनेमा पहायला गेले, सिनेमा पाहिल्यानंतर थेट पोलीस ठाण्यातच पोहचले !
पती-पत्नी जोडीने सिनेमागृहात सिनेमा पहायला गेले. मात्र सिनेमा पाहून पतीचा हिरमोड झाला. त्याला तो सिनेमा आवडला नाही. यातूनच सिनेमागृहातून बाहेर येताच दोघांमध्ये वाद झाला.
कच्छ : गुजरातमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. पती-पत्नीचे भांडण कशावरुन होईल आणि या भांडणामुळे काय होईल याचा नेम नाही. अशीच एक घटना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पती आणि पत्नी दोघे अजय देवगणचा ‘भोला’ सिनेमा पहायला थिएटरमध्ये गेले. सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर पतीला सिनेमा आवडला नाही म्हणून दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीला मारले आणि भांडण अखेर पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी पतीविरोधात फिर्याद नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
पतीला सिनेमा न आवडल्याने दोघांमध्ये भांडण
नागरकचला परिसरात राहणारे कृष्णबा आणि तिचा पती अमरसिंह मोडे हे दोघे सिनेमागृहात अजय देवगणचा ‘भोला’ सिनेमा पहायला गेले होते. सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. सिनेमा चांगला नव्हता, पैसे बरबाद झाले असे पतीचे म्हणणे होते. यातूनच दोघांचा वाद टोकाला गेला. पतीने पत्नीला सिनेमागृहाबाहेरच मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु
यानंतर पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरोधात फिर्याद नोंद केली आहे. मारहाणीत महिला जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तपासानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण
भररस्त्यात पती पत्नीला मारहाण करत होता. पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाली. पोलीस तात्काळ महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पत्नीच्या मदतीला आलेल्या पोलिसांनाच पतीने मारहाण केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.