भीषण अपघात! पत्नी आणि सासूच्या डोळ्यांदेखतच त्याने प्राण सोडला
8 दिवसात 3 वेगवेगळ्या अपघातात 5 ठार, 10 महिन्यात तब्बल 47 जणांनी गमावला जीव, 'हा' मार्ग ठरतोय ब्लॅक स्पॉट
अहमदनगर : नगर मनमाड मार्गावर दुचाकीचा मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. देवदर्शनासाठी पत्नी, सासू आणि भाच्यासोबत निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा या अपघातात मृत्यू झालाय. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातानंतर नगर मनमाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पत्नी आणि सासूच्या डोळ्यांदेखत जखमी तरुणाने जागीच प्राण सोडला. या अपघातात मृत तरुण शेतकऱ्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तर सासू आणि भाचा यांना किरकोळ मार लागला असल्याची माहिती मिळतेय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसात झालेला हा तिसरा अपघात आहे. अवघ्या आठ दिवसात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात आतापर्यंत 5 जणांची जीव गमावलाय.
कसा घडला अपघात?
राहुरी येथील सूतगिरणीजवळ बाजार समितीसमोर एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपासमोर ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलर ट्रॅक्टर आणि अज्ञात वाहनाची तरुण शेतकऱ्याला धडक बसली. MH 17 AA 8017 क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन या दुचाकीवरुन ते सर्व जात होतं.
ही धडक इतकी जबर होती, की तरुण जागीच ठार झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्यांचं नाव बापूसाहेब ससाणे, वय 28 आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला
बापूसाहेब हे पत्नी अंजली सासणे, सासू मीराबाई वायदंडे आणि भाचा कार्तिक वायदंडे यांच्यासोबत पुणतांबा येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी त्याच्यावर काळाने घाला घातला.
तरुण शेतकऱ्याचा डोळ्यांदेखत झालेला मृत्यू पाहून त्याची पत्नी आणि सासू यांना मोठा धक्काच बसला. बापूसाहेब यांच्या जखमी पत्नीवर सध्या राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या आठ दिवसांतली या मार्गावरील अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आठ दिवसांत पाच जण तर गेल्या 10 महिन्यात तब्बल 47 जणांनी या मार्गावर आपला जीव गमावला आहे. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्यानं अपघात प्रवण मार्गात योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.