रवी खरात, रायगड : अलिबाग तालुका (Alibag) आणि बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) असं अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. दरवर्षी अलिबाग समुद्र किनारी धुळवडीच्या दिवशी होणाऱ्या बैलगाडा स्पर्धांना प्राचीन परंपरा आहे. यावर्षी मंगळवारी धुळवडी निमित्त आयोजित, अलिबागचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी पुरस्कृत, बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वारांची शर्यत अलिबागच्या समुद्रकिनारी पार पडल्या. या शर्यतींचे आयोजन अलिबाग कोळीवाडा शर्यत प्रेमींच्यावतीने करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान आयोजक आणि शर्यतप्रेमीमध्ये मोठा उत्साह दिसून आला. समुद्र किनारी शर्यती पाहण्याकरीता शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या शर्यतींना अपघाताचे गालबोट लागले. शर्यती पाहणाऱ्या नागरिकांमध्ये भरधाव बैलगाडी (Bullock cart) घुसल्याने दोघा शर्यतप्रेमींनी आपला जीव गमवला आहे.
शर्यत सुरु होताच, भरधाव बैलगाडीचे बैल अचानक उसळले. ही बैलगाडी अनियंत्रित होऊन नागरिकांमध्ये घुसली. हा अपघात इतका भयंकर होता की शर्यतप्रेमींची एकच तारांबळ उडाली. या जीवघेण्या प्रसंगात राजाराम धर्मा गुरव (वय ७५ रा. झिराड) आणि विनायक नारायण जोशी (वय ७०, रा. ब्राम्हण आळी, अलिबाग) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात येत असतानाच विनायक जोशी यांची प्राणज्योत मालवली, तर राजाराम गुरव यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यापूर्वी देखील अलिबाग तालुक्यात संपन्न झालेल्या बैलगाडी शर्यतीत अशाच प्रकारचा भीषण अपघात घडला होता. यात एका शर्यतप्रेमीला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी अलिबाग पोलीसांच्या माध्यमातून शर्यतठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर आयोजकांकडूनही सुरक्षा विषयक उपाय योजना करण्यात आली होती. मात्र शर्यत शौकीनांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. काही शर्यतशौकीन किनाऱ्यावर खाली उतरल्याचे दिसून आले, आणि अशातच शर्यतीतील एका बैलगाडीने वेगाने शर्यत पाहणाऱ्या नागरिकांच्या गटालाच धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण प्रकारामुळे शर्यतप्रेमींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.